आ. थोरात यांच्या पाठपुराव्यातून संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत 1 कोटी 60 लाख रुपये लाभार्थींच्या खात्यावर वर्ग
आ. थोरात यांच्या पाठपुराव्यातून संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत 1 कोटी 60 लाख रुपये लाभार्थींच्या खात्यावर वर्ग
संगमनेर प्रतिनिधी –
काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते तथा माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली यशोधन कार्यालय व जनसेवकांच्या वतीने तालुक्यातील वाडी वस्तीवरील योग्य व पात्र लाभार्थींना संजय गांधी निराधार योजनेसह विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात असून या अंतर्गत 11253 पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर 1 कोटी 60 लाख 21 हजार रुपये वर्ग झाले असल्याची माहिती इंद्रजीत भाऊ थोरात यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती देताना इंद्रजीत भाऊ थोरात म्हणाले की, काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील गोरगरीब निराधार वृद्ध व्यक्तींना शासकीय योजनांचा लाभ मिळावा याकरता यशोधन कार्यालयाच्या जनसेवकांमार्फत योग्य व पात्र लाभार्थींचा शोध घेऊन त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जातो.
या अंतर्गत संगमनेर तालुक्यातील अनेक गरजू व्यक्तींना याचा लाभ झाला असून नुकताच संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत अनुसूचित जाती मधील 561 लाभार्थ्यांना 8 लाख 64 हजार रुपये, तर निराधार अनुदान योजनेअंतर्गत अनुसूचित जमाती मधील 228 लाभार्थ्यांना 3 लाख 39 हजार रुपये यांसह श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत 5367 लाभार्थ्यांना 80 लाख पन्नास हजार रुपये ,तर अनुसूचित जातींमधील 701 लाभार्थ्यांना 10 लाख 51 हजार रुपये, श्रावणबाळ गट व सेवा राज्य निवृत्ती योजनेअंतर्गत 325 लाभार्थ्यांना 4 लाख 87 हजार रुपये तर अ गटातील 4070 लाभार्थ्यांना 52 लाख 58 हजार रुपये असे खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत.
संगमनेर तालुका हा विस्ताराने मोठा असून 171 गावे व २५८ वाडी वस्तीवर सातत्याने विविध विकासाच्या योजना राबवण्याबरोबर तालुक्यातील गरजू नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला जात आहे. या सर्व कामातून संगमनेर तालुका हा विकासाचे मॉडेल ठरला आहे.
हे अनुदान लाभार्थींच्या खात्यावर जमा झाल्याने संगमनेर तालुक्यातील विविध योजनेमधील लाभार्थ्यांनी या कामी सातत्याने पाठपुरावा केल्याबद्दल काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात, यशोधन कार्यालय प्रमुख इंद्रजीत भाऊ थोरात व सर्व जनसेवक आणि महसूल यंत्रणेचे आभार व्यक्त केले आहे.