शेजारच्या घरात ड्रग्जचा हैदोस… पुढचा नंबर आपलाही असू शकतो….! ड्रग्ज मुक्त नाशिक केवळ पोलिसांची नाही, प्रत्येक नागरिकाची जबाबदारी!!
शेजारच्या घरात ड्रग्जचा हैदोस… पुढचा नंबर आपलाही असू शकतो….!
ड्रग्ज मुक्त नाशिक केवळ पोलिसांची नाही, प्रत्येक नागरिकाची जबाबदारी!!
………कुमार कडलग, नाशिक ………..
…………………….
आज २६ जून, आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ विरोधी दिन. कॅलेंडरवरचा हा दिवस दरवर्षी येतो, घोषणांची गर्दी करतो, पोस्टरवर झळकतो, सोशल मीडियावर काही तास ट्रेंड होतो आणि मग समाज पुन्हा आपल्या सोयीच्या उदासीनतेत शिरतो. पण या वर्षी हा दिवस फक्त “ड्रग्जला नाही” म्हणण्यापुरता उरू नये. कारण प्रश्न आता एवढाच राहिलेला नाही की काही तरुण व्यसनाच्या आहारी जात आहेत; हा केवळ प्रश्न नाही,तर ड्रग्ज नावाचा विषारी शत्रू आपल्या शेजारच्या घरात, आपल्या गल्लीत, आपल्या मुलांच्या मित्रपरिवारात आणि आपल्या शहराच्या भविष्यात शिरला आहे, आणि आपण अजूनही “पोलिसांनी काहीतरी करायला हवं” एवढंच म्हणून आपली जबाबदारी झटकत आहोत.
आता समाजाने आपली जबाबदारी ओळखण्याची वेळ आली आहे. ड्रग्जची दलदल पोलिसांनी एकट्याने साफ होणार नाही. पोलीस धाडी टाकतील, तस्करांना पकडतील, साठे जप्त करतील, गुन्हे दाखल करतील, पुरवठा साखळीवर घाव घालतील; पण ड्रग्जचा पहिला शिरकाव पोलीस ठाण्यात होत नाही. तो शेजारच्या घरात होतो, आपल्या परिसरात होतो, पानटपरीच्या आडोशाला होतो, कॉलेजच्या कट्ट्यावर होतो, आपल्या मुलांच्या नकळत मैत्रीत होतो. म्हणजेच ड्रग्जची पहिली चाहूल समाजाला लागते, पोलिसांना नाही. आणि तरीही समाज गप्प बसतो. “आपण कशाला पडायचं या भानगडीत?” या एका वाक्याने आपण स्वतःला तटस्थ समजू लागतो. पण वस्तुस्थिती अशी आहे की हे मौनच ड्रग्जच्या धंद्याचं सर्वात मोठं संरक्षण कवच बनतं.
आज एखाद्या शेजारच्या घरात एक मुलगा व्यसनाच्या विळख्यात अडकलेला असेल. सुरुवातीला तो उशिरा घरी येईल, पैशांची मागणी वाढेल, चिडचिड करेल, अभ्यास सुटेल, मित्र बदलतील, घरात खोटं बोलणं सुरू होईल. आईच्या चेहऱ्यावरची काळजी वाढेल, वडिलांच्या कपाळावरच्या आठ्या गडद होतील, घरातलं हसू हरवेल. शेजाऱ्यांना हे सगळं दिसेल. पण ते म्हणतील “त्यांच्या घरचा प्रश्न आहे.” हीच ती चूक आहे,जी उद्या आपल्याच घराला महागात पडू शकते. कारण ड्रग्जला भिंत ओलांडायला वेळ लागत नाही. आज शेजारच्या घरात सुरू झालेली नशेची सवय उद्या तुमच्या मुलाच्या मैत्रीतून तुमच्या घरात येऊ शकते. आज समोरच्या इमारतीत दिसणारी संशयास्पद हालचाल उद्या तुमच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये वावरू शकते. आज दुसऱ्यांच्या घरात निघणारा धूर उद्या तुमच्या घराच्या खिडकीतून आत शिरेल.
यामुळेच ड्रग्जचा प्रश्न हा फक्त एका तरुणाच्या चुकांचा विषय राहात नाही; तो कुटुंब उद्ध्वस्त करणाऱ्या सामाजिक संकटात बदलतो. एक मुलगा व्यसनाधीन झाला की फक्त त्याचं आरोग्य बिघडत नाही; त्याच्यासोबत घरातली आईची झोप मरते, वडिलांचा अभिमान तुटतो, बहिणीच्या डोळ्यांत असुरक्षिततेची भीती भरते, लहान भावाच्या मनात चुकीचं आदर्शचित्र तयार होतं. घरात पैशांची उधळपट्टी, खोटं बोलणं, वस्तू विकल्या जाणं, हिंसक वागणूक, मानसिक तणाव सगळं एकाच वेळी घरात शिरतं. ड्रग्ज एका व्यक्तीला नाही, तर अख्ख्या घराला शिक्षा देतात. आणि तरीही आपण या संकटाकडे “तो त्यांचा प्रश्न” म्हणून पाहणार असू, तर उद्या आपल्या घरात तेच संकट घुसल्यावर तक्रार करण्याचा नैतिक अधिकार आपण गमावून बसतो.
नाशिकमध्ये पोलीस “ड्रग्जमुक्त नाशिक” ही मोहीम राबवत आहेत. ही मोहीम केवळ स्वागतार्हच नाही, तर अत्यंत आवश्यक आहे. पण एक गोष्ट स्पष्ट आहे, ही मोहीम यशस्वी करायची असेल, तर ती पोलिसांची एकट्याची मोहीम न राहता नागरिकांची संयुक्त चळवळ बनली पाहिजे. पोलिसांना प्रत्येक गल्लीच्या प्रत्येक कोपऱ्यात उभं राहता येणार नाही; पण समाजाला आपल्या परिसरावर नजर ठेवणं नक्कीच शक्य आहे. पोलिसांना प्रत्येक मुलाच्या वागण्यातला बदल दिसणार नाही; पण पालकांना, शिक्षकांना, मित्रांना आणि शेजाऱ्यांना तो दिसू शकतो. पोलिसांना प्रत्येक घरातला नि:शब्द आक्रोश ऐकू येणार नाही; पण समाजाने वेळेत हात दिला, तर अनेक घरं उद्ध्वस्त होण्यापासून वाचू शकतात.
म्हणून आज २६ जूनच्या निमित्ताने प्रश्न पोलिसांनी काय केलं याचा नाही; प्रश्न आपण काय करणार याचा आहे.
आपल्या परिसरात संशयास्पद हालचाली दिसल्या, तर आपण माहिती देणार का?
शाळा-कॉलेजच्या आसपास अड्डे तयार होताना दिसले, तर आपण तक्रार करणार का?
शेजारच्या घरात एखादा तरुण भरकटताना दिसला, तर त्या कुटुंबाला मदतीचा हात देणार का?
आपल्या मुलांच्या मित्रपरिवाराबद्दल जागरूक राहणार का?
रात्री उशिरापर्यंत बाहेर राहणं, अचानक पैशांची गरज, आक्रमक वागणं, अभ्यासात उदासीनता, एकलकोंडेपणा हे संकेत गांभीर्याने घेणार का?
की नेहमीप्रमाणे “आपण कशाला पडायचं या भानगडीत ” म्हणत डोळेझाक करणार?
ड्रग्जविरोधी लढाई दोन आघाड्यांवर लढावी लागणार आहे. पुरवठा रोखणे आणि मागणी कमी करणे. पुरवठा रोखण्याचं काम पोलिसांचं आहे; पण मागणी कमी करण्याचं काम समाजाचं आहे. घरात संवाद हवा, शाळांमध्ये जागृती हवी, कॉलेजमध्ये कडक नजर हवी, मित्रांमध्ये योग्य दबाव हवा आणि परिसरात शून्य सहनशीलता हवी. व्यसनाला “कूल” समजणाऱ्या संस्कृतीला ठाम नकार द्यावा लागेल. कारण ड्रग्जचा व्यापार फक्त तस्करांच्या जोरावर वाढत नाही; तो समाजाची भीती, मौन आणि उदासीनतेवर वाढतो.
आजच्या दिवशी नुसती पोस्ट टाकून, स्टेटस ठेवून, भाषण देऊन किंवा पोलिसांचं कौतुक करून जबाबदारी संपत नाही. आज निर्णय घ्यावा लागेल, शेजारचं घर जळत असताना आपण तमाशा पाहणारे प्रेक्षक राहणार, की मदतीचा हात घेऊन धावणारे जबाबदार नागरिक होणार? कारण शेजारचं घर वाचवणं म्हणजे आपल्या घराची पहिली सुरक्षा आहे. समाज जागा झाला, तर ड्रग्जचा अड्डा उभा राहणं कठीण होईल. समाज बोलू लागला, तर तस्करांना आसरा मिळणं कठीण होईल. समाज पुढे आला, तर व्यसनाच्या विळख्यात सापडलेल्या तरुणाला परत उभं राहणं शक्य होईल.
म्हणून आज एक ठाम निर्धार करायला हवा,
शेजारच्या घरात ड्रग्जचा शिरकाव दिसला, तर गप्प बसायचं नाही.
संशयास्पद हालचाली दिसल्या, तर पोलिसांना माहिती द्यायची.
मुलांच्या वर्तनातील बदल दुर्लक्षित करायचे नाहीत.
व्यसनाधीन तरुणाकडे फक्त गुन्हेगार म्हणून नाही, तर उपचार आणि पुनर्वसनाची गरज असलेला व्यक्ती म्हणूनही पाहायचं.
आणि सर्वांत महत्त्वाचं “ही पोलिसांची लढाई आहे” असं न म्हणता “ही माझ्या घराची, माझ्या शहराची, माझ्या भविष्याची लढाई आहे” असं म्हणायचं.
ड्रग्जमुक्त नाशिक ही घोषणा म्हणून ठेवायची, की जबाबदारी म्हणून स्वीकारायची?
उत्तर एकच असलं पाहिजे
ड्रग्जमुक्त नाशिक… माझी जबाबदारी!
शेजारचं घर वाचवा.
आपलं घर वाचवा.
आपला परिसर वाचवा.
आपलं शहर वाचवा.
उद्या उशीर झाल्यावर पश्चात्ताप करण्यापेक्षा, आज सावध होणं आणि उभं राहणं जास्त महत्त्वाचं आहे. आज शेजारच्या घरात उठणारा धूर जर आपल्याला दिसत असेल, तर तो विझवण्यासाठी पुढे जाणं हीच खरी सामाजिक जबाबदारी आहे. नाहीतर उद्या त्याच धुराने आपल्या घराचा श्वास गुदमरवला, तर दोष फक्त तस्करांचा नसेल, तो आपल्या जबाबदारी टाळणाऱ्या मौनाचाही असेल.
-दुनियादारी won’t lie



