ताज्या घडामोडी

*बाबा गेला , दशम्याही गेल्या…आता गद्दारीचा अहवाल कुणाला देणार?*


*बाबा गेला , दशम्याही गेल्या…आता गद्दारीचा अहवाल कुणाला देणार?*

 

कुमार कडलग, नाशिक 

नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल लागून दोन दिवस उलटले असले तरी त्याचे राजकीय पडसाद अद्याप उमटत आहेत. निकालानंतर लगेच सुरु झालेला शिमगा संपला असला तरी राजकारणाचे ओघळ मात्र अजूनही वाहत आहेत. हा केवळ एका जागेचा पराभव किंवा विजय नव्हता. हा निकाल अनेक राजकीय समजुती मोडून काढणारा, अनेकांना वास्तवाचे भान देणारा आणि अनेकांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरला आहे.

पराभवानंतर नरेंद्र दराडे यांनी महायुतीतील अनेक घटक पक्ष आणि नेत्यांवर विश्वासघाताचा आरोप केला. एकनाथ शिंदे यांचा अपवाद वगळता सर्वांनी शब्द फिरवला, असा त्यांचा दावा होता. इतकेच नव्हे तर या कथित गद्दारीचा अहवाल पक्षश्रेष्ठींकडे सादर करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. राजकीय दृष्टिकोनातून पाहता ही त्यांची नैसर्गिक प्रतिक्रिया होती. पराभवानंतर प्रत्येक नेता कारणे शोधतो. कोणी मतदारांना दोष देतो, कोणी सहकाऱ्यांना, कोणी परिस्थितीला. दराडे यांनी विश्वासघाताचा मुद्दा पुढे केला.

पण राजकारणाची गंमत अशी की, हा आरोप हवेत असतानाच घडलेल्या पुढच्या घटनांनी अनेक प्रश्न निर्माण केले.ज्याने निवडणुकीत महायुतीच्या अधिकृत उमेदवाराचा पराभव केला,तेच गोकुळ गीते काही तासांत सत्ताधाऱ्यांच्या राजकीय गळ्यातील ताईत बनले. निकाल जाहीर झाल्यानंतर लगेच त्यांना वाजत गाजत मुंबईत आणले गेले. मग स्वाभाविकच प्रश्न निर्माण झाला की, जर हा विजय महायुतीतील गद्दारीमुळे झाला असेल, तर त्या गद्दारीचा लाभार्थी ठरलेल्या व्यक्तीला इतक्या तत्परतेने जवळ करण्याची घाई का?

मग आता गद्दारीचा अहवाल नेमका कुणाला द्यायचा?

ज्यांनी मतदान केले त्यांच्याविरोधात? ज्यांनी नाराजी व्यक्त केली त्यांच्याविरोधात? की शेवटी त्याच विजेत्याला राजकीय पदरात घेणाऱ्या व्यवस्थेविरोधात?

राजकारणात निष्ठा, विचारधारा, बांधिलकी यांची चर्चा भरपूर होते. पण गेल्या काही वर्षांत महाराष्ट्राच्या राजकारणाने वारंवार एकच धडा दिला आहे,राजकारणात कायमस्वरूपी मित्र नसतात, कायमस्वरूपी शत्रूही नसतात. कायमस्वरूपी असते ती केवळ राजकीय उपयुक्तता.

कालपर्यंत कट्टर विरोधक असलेले आज एकत्र आहेत. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले तेच पुढे सत्तेत सहभागी झाले. ज्यांना गद्दार म्हटले गेले तेच काही महिन्यांत मान्यवर सहकारी बनले. त्यामुळे विश्वासघात, निष्ठा, विचारधारा हे शब्द आता राजकीय भाषणांत चांगले वाटतात; प्रत्यक्ष व्यवहारात मात्र आकडेमोड आणि सत्तासमीकरणेच महत्त्वाची ठरतात.

याच पार्श्वभूमीवर दराडे यांची अवस्था अधिकच कठीण दिसते. कारण पराभव हा एकवेळ पचवता येतो. पण ज्यांच्यावर विश्वास ठेवला, त्याच राजकीय व्यवस्थेने विजेत्याशी संवाद साधला. जुळवून घेतले , हे पचवणे अधिक अवघड असते.

आज नाशिकच्या राजकीय वर्तुळात उपरोधाने एक वाक्य ऐकायला मिळत आहे”बाबाही गेले आणि दशम्याही गेल्या!”

Advertisement

या म्हणीचा अर्थ साधा आहे. ज्यासाठी संघर्ष केला ते मिळाले नाही आणि जे आधी हातात होते तेही टिकले नाही.

निवडणुकीपूर्वी दराडे गटाच्या आत्मविश्वासाला उधाण आलेले दिसत होते. सत्ता, संघटन, महायुतीची ताकद, वरिष्ठांचे पाठबळ आणि स्थानिक राजकीय समीकरणे या सर्वांची बेरीज विजय निश्चित असल्याची भावना निर्माण करत होती. विरोधकांना गांभीर्याने घेण्याची गरजही अनेकांना वाटत नव्हती.

पण मतदारांनी वेगळाच निर्णय दिला.

गोकुळ गीते यांचा विजय हा केवळ एका उमेदवाराचा विजय नव्हता. तो अनेक वर्षे साचलेल्या नाराजीचा उद्रेक होता. तो कार्यकर्त्यांच्या असंतोषाचा आवाज होता. तो राजकीय अहंकाराविरुद्धचा इशारा होता.

दराडे गटाविषयी मतदारांच्या मनात निर्माण झालेली नाराजी केवळ विकासकामांपुरती मर्यादित नव्हती. अनेकांना सत्तेमुळे आलेली मुजोरी खटकत होती. प्रतिस्पर्ध्यांना कमी लेखण्याची वृत्ती खटकत होती. काहींना संवादाचा अभाव जाणवत होता. काहींना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारांबद्दल निर्माण झालेली उपेक्षेची भावना अस्वस्थ करत होती.

ही सगळी नाराजी मतपेटीतून व्यक्त झाली.

आज पराभवाचे कारण म्हणून गद्दारीचा मुद्दा पुढे केला जात असला, तरी आत्मपरीक्षणाचा मुद्दा टाळता येणार नाही. कारण जर इतक्या मोठ्या प्रमाणावर मतदार दूर गेले असतील, तर त्यामागे केवळ विरोधकांचे षड्यंत्र असू शकत नाही. त्यामागे स्वतःच्या राजकारणातील काही त्रुटीही असू शकतात.

राजकारणात सर्वात धोकादायक गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे स्वतःला अजिंक्य समजण्याची मानसिकता.

मतदार शांत असतो, पण मुकबधिर नसतो. तो सर्व पाहत असतो. योग्य वेळ आल्यावर तो निर्णयही घेतो. आणि त्या निर्णयाला कोणतीही सत्ताकेंद्रे थांबवू शकत नाहीत.

आज नाशिकच्या निकालाने हेच दाखवून दिले आहे.

दराडे गटासाठी या पराभवात एक संधीही दडलेली आहे. कारण प्रत्येक मोठा पराभव काहीतरी शिकवून जातो. प्रश्न एवढाच आहे की त्यातून धडा घेतला जाणार की अजूनही गद्दारीच्या कहाण्यांमध्येच समाधान शोधले जाणार?

कारण राजकारणात एक गोष्ट निश्चित असते,सत्ता कायम राहत नाही. आजचा विजेता उद्या पराभूत होऊ शकतो आणि आजचा पराभूत उद्या पुन्हा विजयी होऊ शकतो.

मात्र त्यासाठी वास्तव स्वीकारावे लागते.

आज नाशिकच्या राजकारणात सर्वात मोठा मुद्दा गोकुळ गीते यांच्या विजयाचा नाही. सर्वात मोठा मुद्दा हा आहे की या निकालानंतर दराडे गट स्वतःत डोकावून पाहणार का?

कारण गद्दारीचा अहवाल लिहिणे सोपे असते. आत्मपरीक्षणाचा अहवाल लिहिणे कठीण असते.

आणि म्हणूनच या संपूर्ण घडामोडींकडे पाहताना शेवटी

ज्याने पराभूत केले त्यालाच जर काही तासांत राजकीय सन्मानाने जवळ केले जाणार असेल, तर गद्दारीचा अहवाल आता नेमका कुणाच्या नावाने लिहायचा?

आणि दुसरा प्रश्न पराभवाचे खरे कारण विश्वासघात होते, की मतदारांनी दाखवलेली जागा?

-दुनियादारी won’t lie


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *