क्राईम

ज्यांनी घोषणा नाहीत, पिढ्या घडवल्या… भाऊसाहेब संतुजी थोरात : संगमनेरच्या मातीत रुजलेला विकासाचा दीपस्तंभ


ज्यांनी घोषणा नाहीत, पिढ्या घडवल्या…

भाऊसाहेब संतुजी थोरात : संगमनेरच्या मातीत रुजलेला विकासाचा दीपस्तंभ

.……कुमार कडलग……… नाशिक………..

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाने अनेक नेते पाहिले. काहींनी सत्ता गाजवली, काहींनी घोषणा दिल्या, काही इतिहासात फोटो म्हणून उरले.

पण काही माणसं अशी असतात, जी नावाने नव्हे तर परिणामाने ओळखली जातात.

संगमनेर तालुक्यासाठी भाऊसाहेब संतुजी थोरात हे असेच एक नाव आहे,जे कुठल्याही शिलालेखावर नाही, पण हजारो घरांच्या कोणाड्यातून डोकावणारा विकासाचा कवडसा आहे.

 

………..१२ जानेवारी : विचारांची जयंती…………….

१२ जानेवारी हा केवळ एका व्यक्तीचा जन्मदिवस नाही.

तो संगमनेर तालुक्याच्या वैचारिक प्रवासाचा दिवस आहे.

भाऊसाहेब संतुजी थोरात, अवघ्या संगमनेर तालुक्याचे दादा… यांची जयंती साजरी करताना हार-तुरे, फोटो आणि कार्यक्रम पुरेसे नाहीत.कारण भाऊसाहेबांचा जन्म दिनदर्शिकेत नव्हे,तर ग्रामीण महाराष्ट्राच्या परिवर्तनाच्या इतिहासात नोंदलेला आहे.आज जेव्हा शिक्षणाचा दिवा प्रत्येक खेड्यात पेटलेला दिसतो,जेव्हा ग्रामीण मुलगा आत्मविश्वासाने शहराशी स्पर्धा करतो,जेव्हा मुलगी शिक्षणाच्या बळावर स्वतःची ओळख घडवते,तेव्हा नकळत दादांची आठवण येते.

१२ जानेवारीला त्यांचे स्मरण करायचे म्हणजे,फक्त भूतकाळाकडे पाहणं नव्हे,तर भविष्यासाठी जबाबदारी स्वीकारणं आहे.त्यांनी उभारलेल्या संस्था जिवंत आहेत,पण त्याहून जिवंत आहे त्यांचा विचार.“शिक्षणाशिवाय विकास नाही, आणि माणूस केंद्रस्थानी नसेल तर कोणताही विकास टिकत नाही.”आजच्या राजकारणात गोंगाट आहे,विकासाच्या घोषणा आहेत,पण भाऊसाहेबांची जयंती आठवण करून देते.खरा बदल शांतपणे, सातत्याने आणि निष्ठेने घडवावा लागतो.

१२ जानेवारी हा दिवस म्हणूनच एक औपचारिक जयंती न राहता स्वतःला प्रश्न विचारण्याचा दिवस ठरायला हवा,

आपण शिक्षणासाठी काय करतोय?आपण समाजासाठी काय उभं करतोय?आपण पुढील पिढीसाठी काय सोडून जातोय?भाऊसाहेब संतुजी थोरात यांना खरी श्रद्धांजलीम्हणजे त्यांच्या विचारांना आणखी पुढे नेत दिशा देणं.

१२ जानेवारी,एका माणसाची जयंती नव्हे,

तर संगमनेरच्या विकासाच्या आत्म्याचा उत्सव.

…………………….

भाऊसाहेब थोरात हे स्वातंत्र्यसैनिक होते. १९४२ च्या भारत छोडो आंदोलनात त्यांनी तुरुंगवास भोगला. पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी विचार केला,

“ब्रिटिश गेले, पण अज्ञान, दारिद्र्य आणि असमानता अजूनही इथेच आहे.”

आणि याच विचारातून त्यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धातील खरी लढाई सुरू झाली.

सत्तेचा मार्ग टाळून व्यवस्थेचा मार्ग:-

स्वातंत्र्योत्तर काळात अनेकांनी राजकारणाचा मार्ग निवडला. भाऊसाहेब थोरात यांनी मात्र वेगळा रस्ता धरला.संस्था उभारण्याचा.

१९७८ मध्ये त्यांनी उभी केलेली अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्था म्हणजे केवळ संस्था नव्हे, तर ग्रामीण महाराष्ट्रासाठी आशेची वाहिनी ठरली.

ज्या संगमनेर तालुक्यात शिक्षणासाठी मुलांना गाव सोडावे लागत होते, तिथेच शिक्षण पोहोचवण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला.

त्या काळात ग्रामीण भागात अभियांत्रिकी, फार्मसी, व्यवस्थापन शिक्षण ही केवळ स्वप्नं होती.

भाऊसाहेबांनी त्या स्वप्नांना इमारती दिल्या.पुस्तकं दिली.

आणि सर्वात महत्त्वाचं,आत्मविश्वास दिला.

शिक्षणातून बदललेली संगमनेरची ओळख

आज संगमनेर तालुक्याकडे पाहिलं, तर लक्षात येतं की

इथे शिक्षण म्हणजे केवळ पदवी नव्हे;

इथे शिक्षण म्हणजे सामाजिक परिवर्तन.

अमृतवाहिनीमधून शिकलेली मुलं आज डॉक्टर, अभियंते, अधिकारी, उद्योजक आहेत.

ही फक्त व्यक्तींची यशोगाथा नाही,

तर संपूर्ण तालुक्याच्या सामाजिक इतिहासाचा टर्निंग पॉईंट आहे.

ग्रामीण कुटुंबातील मुलगी शिक्षणासाठी बाहेर जाणं हे कधीकाळी धाडस मानलं जायचं.

आज ते स्वाभाविक वाटतं.

हा बदल कुठल्या कायद्यामुळे नाही,

तो भाऊसाहेबांच्या दूरदृष्टीमुळे आहे.

विकास म्हणजे फक्त रस्ते नाहीत

भाऊसाहेब थोरात यांचा विकासाचा अर्थ वेगळा होता.

त्यांच्यासाठी विकास म्हणजे—

शेतकऱ्याला ज्ञान

तरुणाला संधी

महिलेला आत्मसन्मान

आणि समाजाला दिशा

Advertisement

सहकार चळवळीतून त्यांनी ग्रामीण अर्थव्यवस्थेला आधार दिला.

शेतीविषयक प्रशिक्षणातून त्यांनी शेतकऱ्यांना काळाबरोबर चालायला शिकवलं.

त्यांचा विकास आराखडा कागदावर नव्हता.तो माणसांमध्ये रुजलेला होता.

उणीव की वास्तव?

आज मागे वळून पाहताना काही जण प्रश्न विचारतात.

तालुक्यातील सर्वच भागांचा विकास झाला का?

संस्था-केंद्रित विकासापुरताच बदल मर्यादित राहिला का?

हे प्रश्न गैर नाहीत.पण हेही तितकंच खरं आहे की

एका व्यक्तीकडून सर्वच व्यवस्था बदलण्याची अपेक्षा ठेवणं अन्यायकारक आहे.भाऊसाहेबांनी जे केलं, ते सरकारने करायला हवं होतं.पण त्यांनी ते स्वतःच्या ताकदीवर केलं.

नाव न गाजवता अमर झालेला माणूस

भाऊसाहेब संतुजी थोरात यांनी कधी स्वतःचा गवगवा केला नाही.ते जाहिरातीत दिसले नाहीत.ते भाषणांच्या माऱ्यात ऐकू आले नाहीत.पण आज संगमनेर तालुक्यात जर कुठल्या घरात शिकलेला मुलगा नोकरीला असेल,कुठली मुलगी आत्मविश्वासाने उभी असेल,कुठला शेतकरी ज्ञानावर शेती करत असेल,तर त्या प्रत्येक यशामागे भाऊसाहेब थोरात यांचा अदृश्य हात आहे.

खरा वारसा

भाऊसाहेबांचा खरा वारसा म्हणजे संस्था,माणसं आणि विचार

त्यांचे स्मारक म्हणजे पुतळा नाही,

तर पिढ्यानपिढ्या चालणारा शिक्षणाचा प्रवाह आहे.

संगमनेरच्या इतिहासात काही नावं काळाच्या ओघात विसरली जातील,पण ज्यांनी माणसं घडवली,ते नाव कधीही मिटत नाही.

भाऊसाहेब संतुजी थोरात…

एक व्यक्ती नव्हे,

एक युग,

एक दिशा,

आणि संगमनेरच्या विकासाचा आत्मा.

……..

जा गोठ्यात शेण भर…” : विकासाची खरी शिकवण

एक किस्सा आजही मनात ठळकपणे कोरलेला आहे.

महाविद्यालयीन शिक्षण सुरू होत होतं,अखेरचा टप्पा.

माझाच एक मित्र, माझ्यापेक्षा दोन वर्षांनी मोठा. त्याचं शिक्षण पूर्ण झालेलं.

वडील भाऊसाहेब थोरात यांचे खंदे समर्थक.

त्या काळात अशी समजूत होती की,

भाऊसाहेबांचे माणूस असाल, तर सह्याद्रीसारख्या शिक्षण संस्थेत नोकरी लागणं फारसं कठीण नाही.

याच आशाळभूत भावनेत मित्र मला घेऊन “दादांच्या” भेटीला गेला.

भेट झाली.

दादांनी अत्यंत आपुलकीने चौकशी सुरू केली.

पण आश्चर्य म्हणजे,शिक्षण, पदवी, टक्केवारी याबद्दल एकही प्रश्न नाही.

त्यांनी विचारले,जमीन किती आहे?

पाणी किती आहे?

गोवंश आहे का?

कुठली पिकं घेतो?

गावात परिस्थिती कशी आहे?

मित्र बोलत गेला…

आणि आम्हाला जाणवत गेलं.

दादांना तालुक्यातील घर ना घर माहिती होती .

प्रत्येक कुटुंबाची परिस्थिती त्यांना ठाऊक होती.

मित्राची परिस्थितीही त्यांना माहीतच होती.

पण ती त्याच्याच तोंडून वदवून घेतली त्याला जाणीव करून देण्यासाठी.

सगळं ऐकून झाल्यावर, दादांनी थेट, अधिकारवाणीने सांगितलं—

“अरे, एवढं असतांना कशाला हवी नोकरी?

जा गोठ्यात शेण भर.

गोमातेची सेवा कर.

शेती फुलव.”

क्षणभर शब्द कडक वाटले.

सुर दरडावनीचा वाटला.

पण त्या वाक्यामागे राग नव्हता.

होती ती शेतीवरची निष्ठा,

गोवंशाविषयीचा जिव्हाळा,

आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवरचा अपार विश्वास.

त्या अधिकारवाणीत एकच शुद्ध भावना दडलेली होती;

आपल्या मुलांनी शेतीचा विकास करावा,

कुटुंब समृद्ध करावं,

गाव उभं करावं,

राज्य आणि राष्ट्र बळकट करावं.

ज्यांना दादांचं हे बोलणं समजलं

ते पुढे प्रगतशील शेतकरी झाले.

ज्यांना समजलं नाही—

ते ना शेतीत टिकले,

ना नोकरीत स्थिरावले.

आणि शेवटी झेंडे, सतरंज्या उचलत

विरोधकांची दारे पुजू लागले.

हा होता दादांचा विकासदृष्टिकोन

भाऊसाहेब थोरात यांच्यासाठी विकास म्हणजे

फक्त नोकरी नव्हे,

फक्त पद नव्हे,

फक्त संस्था नव्हे—

विकास म्हणजे स्वावलंबन.

विकास म्हणजे शेतीची प्रतिष्ठा.

विकास म्हणजे गावाच्या मातीशी नातं.

ज्या काळात शेतीकडे पाठ फिरवणं प्रगती समजलं जातं,

त्या काळात दादांनी शेतीला भविष्य मानलं होतं.

हा किस्सा म्हणजे केवळ आठवण नाही.

तो दादांच्या कृषी विकासाच्या स्वप्नाचा जिवंत दस्तऐवज आहे.

१२ जानेवारीला त्यांची जयंती साजरी करताना

हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारावा,

आपण शेतीकडे कसं पाहतो?

आणि आपण विकास म्हणजे नेमकं काय समजतो?

भाऊसाहेब थोरात यांची खरी ओळख

याच प्रश्नांत दडलेली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *