पंचवटी व जेलरोड येथील शिवस्मारकाचे काम लवकरात लवकर पूर्ण करा! नाशिक शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मनपा अति.आयुक्तांना निवेदन
पंचवटी व जेलरोड येथील शिवस्मारकाचे काम लवकरात लवकर पूर्ण करा!
नाशिक शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मनपा अति.आयुक्तांना निवेदन
नाशिक प्रतिनिधी
पंचवटी व जेलरोड येथील शिवस्मारकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा बसवून लवकरात लवकर सुशोभीकरणाचे काम पूर्ण करावे यासाठी नाशिक शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून नाशिक महानगर पालिका अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांना निवेदन देण्यात आले.
आपल्या नाशिक शहराला एक सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे, विशेष म्हणजे नाशिक शहराचे केंद्रबिंदू म्हणून ओळख असलेल्या व पर्यटकांच्या दृष्टीने महत्व प्राप्त झालेल्या पंचवटी मध्ये आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेल्या पंचवटी कारंजा येथील शिवस्मारकामध्ये हिंदवी स्वराज्याचे संस्थापक *श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा बसविण्यासाठी व सुशोभीकरणासाठी गेल्या ८-९ महिन्यांपासून शिवस्मारकाचे काम रखडलेले आहे, त्यामुळे अनेक शिवप्रेमींनी याबाबत नाराजी व्यक्त करत लवकर काम पूर्णत्वास जावे अशी मागणी केली.सदर कामाला वेगाने गती देण्याची मागणी जोर धरू लागली.
तसेच जेलरोड येथील चौकात असणाऱ्या शिवस्मारकाचे देखील तीच अवस्था आहे, परिस्थिती जैसे थे असल्याचे पाहायला मिळते. अनेक शिवप्रेमींनी याबाबत नाराजी व्यक्त करत लवकर काम पूर्णत्वास जावे अशी मागणी केली.
पंचवटी सह संपूर्ण नाशिक शहरात फेब्रुवारी मध्ये शिवजन्मोत्सव तमाम शिवप्रेमींकडून मोठ्या प्रमाणात उत्साहात, जल्लोषात साजरा करण्यात येतो. नुकत्याच एक-दीड महिन्यांवर शिवजन्मोत्सव येत असून त्या अगोदर लवकरात लवकर पंचवटी व जेलरोड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा बसवून सुशोभीकरणाचे काम पूर्ण करावे, अन्यथा नाशिक शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
यावेळी नाशिक शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार शहर कार्याध्यक्ष किरण पानकर, वाहतूक तालुकाध्यक्ष विलास धात्रक, उत्तर महाराष्ट्र ओबीसी उपाध्यक्ष चेतन जगताप, पंचवटी ओबीसी अध्यक्ष ललित ठेंगे, उपाध्यक्ष सुनील ओसवाल, लेवेश ठेंगे, दीपक कुलकर्णी, निखिल गायकवाड, संदीप शेळके, राहुल शेलार, तुषार साळवे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.