क्राईम

मतदारांना मुजोरीचा, दादागीरीचा उबग ; सत्तेचा माज २३ तारखेला पराभूत होणार!


मतदारांना मुजोरीचा, दादागीरीचा उबग ;

 

सत्तेचा माज २३ तारखेला पराभूत होणार!

 

 

नाशिक जिल्ह्यातील १५ पालक निवडण्यासाठी काही तास मतदारांच्या हातात उरले आहेत. प्रचाराचा धुराळा जेव्हढा उडवायचा तेव्हढा उडवून झाला आहे. प्रतिस्पर्धी उमेदवार, राजकीय पक्ष, त्या पक्षांचे नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करुन मोकळे झाले आहेत. याही काळात सर्वच राजकीय पक्षांमध्ये आवक जावक सुरूच आहे. कार्यकर्ते आणि भाडोत्री श्रोते यांची चंगळ होत आहे. यात काही रात्री इकडे दिवसा तिकडे अशी डबल शिप करणारेही आपले हात धुवून घेत आहेत. हे चित्र वर वर दिसत असले तरी वातावरणाच्या पोटात शिजत असलेली खिचडी या १५ जणांचे भवितव्य निश्चित करणार आहे.

कोण जिंकणार, कोण पराभूत होणार, कुठला समाज घटक कुणाच्या पारड्यात आपल्या मतांचे दान टाकणार यावर अनेक जाणकार आपापली मते मांडत आहेत. काही तटस्थ पणे आपले विशेषण नोंदवत आहेत. तर काहींनी मतांचे ध्रुवीकरण करण्याच्या उद्देशाने आपली विद्वत्ता पाजण्याचे कंत्राट घेतले आहे. या विकाऊ विद्वतेची किंमत दोन्ही बाजूने सक्रिय असलेल्या ४०, ५० पैशांच्या ट्रोल गँगपेक्षा जनतेच्या म्हणजे मतदारांच्या मनात अधिक नाही हे २३ नोव्हेंबरच्या संध्याकाळ पर्यंत अगदी स्पष्ट झालेले असेल.

यंदाच्या निवडणुकीत प्रत्येक मतदार संघात वेगवेगळ्या धाटणीच्या निवडणुका होत आहेत. प्रथम दर्शनी महायुती, महाविकास आघाडी आणि काही अंशी अस्तिवासाठी लढत असलेली महा परिवर्तन शक्ती हे तीनही पक्ष एकत्र असल्याचे भासत असले तरी धूमसत असलेला अंतर्गत लाव्हा मतदानावर परिणाम करून गेला तर अजिबात नवल वाटायला नको. त्यातच उमेदवारांनी ज्यांच्या हातात आर्थिक व्यवहार सोपवले आहेत, त्यांची मनमानी समाजाच्या प्रत्येक घटकाला नाराज करीत असल्याने त्याचाही प्रासांगिक परिणाम मतदानावर होईल असे चित्र उमटणाऱ्या प्रतिक्रियेतून समोर येत आहे.

Advertisement

प्रत्येक मतदार संघांची भौगोलिक स्थिती, सामाजिक स्थिती, स्थानिक प्रश्न, उमेदवाराचा स्वभाव, त्यांचे मतदार संघात असलेले हित संबंध, आजवरच्या कारकिर्दीत उधळलेले गुण या साऱ्या घटकांचा परिणाम मतदानावर होणार असल्याने अचूक अंदाज कुणालाच बांधता येत नाही. तरीही काही मतदार संघ आपला कल स्पष्ट करीत आहेत.

सध्या चूरशीच्या म्हणून लक्षवेधी ठरलेल्या जिल्ह्यातील प्रमुख लढतीत नांदगाव, येवला, देवळा चांदवड, आणि नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदार संघावर अवघ्या जिल्ह्याचे लक्ष आहे. त्यापाठोपाठ दिंडोरी, कळवण सुरगाणा, इगतपुरी, सिन्नर, काही प्रमाणात निफाड याही लढतीवर जिल्ह्याचे लक्ष आहेच.यापैकी जिथे शाश्वत विजयाचा दावा केला जात आहे, तिथे धक्कादायक निकाल लागू शकतात असे आजचे चित्र आहे. अनेक मतदार संघात स्वयं स्फूर्तीने उमेदवाराच्या प्रचारात उतरले आहेत. इकडे आघाडी महायुतीचा धर्म पाळला जात नाही. केवळ सत्तेचे स्वप्न पाहून मतदारांना मैत्रीपूर्ण लढतीची भुरळ घातली जात असल्याचे एव्हाना मतदारांच्या लक्षात आले आहे. दादागिरी, भ्रष्टाचारात लुप्त असलेले उमेदवार एकमेकांवर आगपाखड करीत असल्याने काही संवेदनशील मतदार संघात या दोन्ही उमेदवारांकडे मतदारांनी पाठ फिरवली, हे निकालाच्या दिवशी लक्षात येईल. लोकांनी बहुतेक ठिकाणी निवडणूक आपल्या हातात घेतली आहे. पुढाऱ्यांच्या हातून ही निवडणूक केव्हाच निसटली आहे. केवळ गुर्मीत प्रचार सभा गाजविण्याचा खटाटोप सुरु आहे. लोकांना उमेदवारांची मुजोरी, सत्तेचा माज, दादागिरी या गोष्टींचा उबग आला आहे. त्याचेच फळ २० तारखेला पदरात पडून या प्रवृत्तीचा २३ तारखेला खरा निकाल लागणार आहे.

-कुमार कडलग, नाशिक


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *