विजयाची खात्री नसल्यानेच डमी गणेश गीतेला निवडणुकीच्या बोहल्यावर चढवले; राष्ट्रवादीच्या गणेश गीते यांचा सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारावर गंभीर आरोप
विजयाची खात्री नसल्यानेच डमी गणेश गीतेला निवडणुकीच्या बोहल्यावर चढवले;
राष्ट्रवादीच्या गणेश गीते यांचा सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारावर गंभीर आरोप
नाशिक प्रतिनिधी
विकासाच्या नावावर निवडणूक लढविण्याची वलग्ना करणाऱ्या आमदार उमेदवारांना डमी गणेश गीते नावाची माणसे शोधून त्यांना बळजबरीने उमेदवारी अर्ज दाखल करण्यास भाग पाडले जाते यातच या मंडळींचा विकास किती वांझ आहे, हेच स्पष्ट होते. या शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून नाशिक पूर्व विधानसभा मतदार संघात उमेदवारी दाखल केलेले गणेश गीते यांनी विरोधकांच्या शिडातील हवा काढली. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर तातडीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आघाडीचे अधिकृत उमेदवार गणेश गीते यांनी खळबळजनक खुलासा केला.
नाशिक पूर्व विधानसभा मतदार संघातून विद्यमान आमदार राहुल ढिकले भाजपच्या वतीने महायुतीची उमेदवारी करीत आहेत. या निवडणुकीत सत्ताधारी आमदारांचे आव्हान कसे पेलणार या प्रश्नाचे उत्तर देतांना महाविकास आघाडीचे गणेश गीते यांनी हा खुलासा केला.
गेल्या पाच वर्षात या आमदारांनी खरोखर विकास केला असता तर गावोगावी फिरून गणेश गीते नावाचे माणसं शोधून, त्यांना आर्थिक अमिष दाखवून उमेदवारी दाखल करून, मतदारांची दिशाभूल करण्याची गरज भासली नसती. विजयाची खात्री नसल्यामुळे त्यांनी हा षडयंत्री उपदव्याप करीत आहेत.
विरोधकांकडून गणेश गीते नावाच्या व्यक्तीचा शोध घेतला जात असल्याचा पुरावा म्हणून राष्ट्रवादीचे गणेश गिते यांनी संबंधितांमध्ये झालेल्या संभाषणाची ऑडिओ क्लिपही पत्रकारांना ऐकवली.