उच्चशिक्षित, सुसंस्कारित विद्यार्थी ही राष्ट्राची संपत्ती आहे. राष्ट्र उभारणीत युवकांचे योगदान महत्त्वाचे आहे – किशोर राठी
उच्चशिक्षित, सुसंस्कारित विद्यार्थी ही राष्ट्राची संपत्ती आहे. राष्ट्र उभारणीत युवकांचे योगदान महत्त्वाचे आहे – किशोर राठी
सिन्नर:
उच्चशिक्षित, सुसंस्कारित विद्यार्थी ही राष्ट्राची संपत्ती आहे. राष्ट्र उभारणीत युवकांचे योगदान महत्त्वाचे आहे. त्याचा पाया शालेय जीवनातच घडतो. वडांगळी सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यात न्यू इंग्लिश स्कूलचे योगदान महत्त्वाचे आहे. असे प्रतिपादन सिन्नर येथील प्रसिद्ध उद्योगपती किशोर राठी यांनी केले.
मविप्र संस्था संचलित वडांगळी (ता. सिन्नर) येथील न्यू इंग्लिश स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयात येवला येथील श्री लक्ष्मीनारायण राठी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे दहावी व बारावीमधील पहिल्या तीन क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक देऊन गुणगौरव करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष सुदेश खुळे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. व्यासपीठावर श्री लक्ष्मीनारायण राठी बहुउद्देशीय संस्थेचे संचालक किशोर राठी, मविप्रचे सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक राजाराम मुंगसे, कवी किरण भावसार, मविप्रचे युवा सभासद विक्रम खुळे, मुख्याध्यापक बाळासाहेब खैरनार, पर्यवेक्षिका मंगल हांडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात शालेय वाद्य वृंदातील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या राष्ट्रगीत, राज्यगीत आणि सुमधुर स्वागतगीताने झाली. मुख्याध्यापक खैरनार यांनी प्रास्ताविकात दरवर्षी श्री लक्ष्मीनारायण राठी बहुउद्देशीय संस्था विद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी दहावी, बारावीतील विद्यार्थ्यांना भरघोस बक्षिसे देऊन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवतात, त्याबद्दल आभार व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात मोबाईलच्या वेडापासून दूर राहत शैक्षणिक प्रगती साधावी असे आवाहन प्राध्यापक राजाराम मुंगसे यांनी आपल्या भाषणात केले. शालेय समितीचे अध्यक्ष सुदेश खुळे यांनी लक्ष्मी नारायण राठी बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या कार्याचा आपल्या अध्यक्षीय भाषणात गौरव केला.
कार्यक्रमात दहावीतील गुणवंत विद्यार्थी आकांक्षा शेखर खुळे (९२.८० टक्के), श्रेया नीलेश लोहारकर (९२.४०), सार्थक वसंत सहाणे (९१.८०), तर बारावी विज्ञान शाखेतील मयूर लक्ष्मण गोसावी (७९.३३ टक्के), समृद्धी सुदेश खुळे (७५.३३), हर्षदा परशराम घुले (७३.३३), बारावी कला शाखेतील अनुराधा संजय चव्हाणके (७८.८३) यांना श्री लक्ष्मीनारायण राठी बहुउद्देशीय संस्थेतर्फे ट्रॉफी, प्रशस्तिपत्र, रोख बक्षीस व गुलाबपुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. शिक्षिका प्रीती सानप यांनी सीटीईटी परीक्षेत प्राविण्य मिळवल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
सुत्रसंचलन शंकर सांगळे यांनी केले. प्रास्ताविक प्राचार्य बाळासाहेब खैरनार यांनी केले तर आभार बाळासाहेब सांगळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संगीत शिक्षक सचिन सानप, तुकाराम सानप, विलास तांबे, पूनम कोल्हे, खंडू गीते दिलीप सोनवणे, योगेश खुळे, विजय कोकाटे, ज्ञानेश्वर खडताळे सुभाष ठोक आदींनी परिश्रम घेतले.