उपवास- उपवाशी की दुप्पट खाशी ?
उपवास- उपवाशी की दुप्पट खाशी ?
उपवास म्हणजे उप आणि वसन.उप म्हणजेच निकट,वसन म्हणजे सानिध्यात जाणे. ईश्वराच्या निकट सानिध्यात जाणे म्हणजेच उपवास होय.
आपल्या संस्कृतीत श्रावण महिना आला म्हणजे व्रत,वैकल्ये,उपवास,जप,तप,अनुष्ठान सुरू होतात.धार्मिक दृष्ट्या श्रावण महिन्याला खूप महत्त्व आहे.या महिन्यात उपवास ठेवले जातात. ह्या लेखात आयुर्वेदिक,आधुनिक तसेच यौगिक दृष्ट्या उपवासाचे काय महत्त्व आहे हे जाणून घेऊ..
*आयुर्वेद दृष्टिकोन:-*
उपवासालाच आयुर्वेदात लंघन असेही म्हणतात.
*”लंघनं परमौषधं l”*
लंघन म्हणजेच उपवास हे श्रेष्ठ औषध आहे असे आयुर्वेदात सांगितलेले आहे .
*”यत् किंचित् लाघवकरं देहे तत लंघनं स्मृतं ll “*
ज्यामुळे शरीराला लाघव म्हणजेच हलकेपणा येतो त्याला लंघन असे म्हणतात. आयुर्वेदात लंघनाचे दहा प्रकार सांगितले आहेत त्यापैकी एक प्रकार म्हणजे उपवास होय. आयुर्वेदानुसार लंघन केल्याने शरीरातील टॉक्झिन्स चे अग्नी पाचन करतो त्यामुळे शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते.तसेच त्यामुळे धातू अग्नी प्रज्वलित होतात व पेशी स्तरावर शुद्धीकरणाचे काम जोरात सुरू होते.उपवासा मुळे शरीराचा मेटाबोलिक रेट वाढतो.
*यौगिक दृष्टिकोन:-*
योगशास्त्रानुसार उपासना करण्यासाठी उपवास आवश्यक आहे. आपल्या शरीराला आवश्यक असलेल्या ऊर्जेपैकी सूर्यप्रकाश,हवा आणि पाणी यांच्यापासून 60% ऊर्जा प्राप्त करावी व फक्त 40% च ऊर्जा अन्नापासून मिळवावी असे योगशास्त्र सांगते.अन्न सेवन करतांना ते अडीच तासात पचन होईल एवढेच घ्यावे. तसेच भोजणानंतर कमीत कमी पाच तास व जास्तीत जास्त आठ तासानंतर अन्न घेतले पाहिजे असे योगशास्त्र सांगते.योगशास्त्रानुसार उपवासात फलाहार घेण्यास सांगितले आहे. फराळ हा शब्द फलाहार या शब्दाचा अपभ्रंश होऊन तयार झालेला आहे. फळांमध्ये 90% जलांश असतो. म्हणजेच उपवासाच्या दिवशी कमीत कमी अन्न पोटात जावे हा उद्देश असतो.
*आधुनिक शास्त्र(ऑटोफॅगी):-*
जपानचे सेल बायोलॉजिस्ट योशिनोरी ओसुमी यांना चिकित्सा क्षेत्रातील ऑटोफॅगी च्या महत्त्वपूर्ण संशोधनासाठी 2016 चे नोबेल पारितोषिक दिले गेले. योशिनोरी ओसुमी यांनी आपल्या संशोधनात सिद्ध केले की जर काही तासापर्यंत काहीही खाल्ले नाही तर, शरीरातील सुदृढ पेशी आपल्या शरीरातील मृतपेशी तसेच विषारी तत्व स्वतःच खाऊन नष्ट करतात.या प्रक्रियेलाच ऑटोफॅगी म्हणतात. ऑटोफॅगी या शब्दाचा अर्थ आहे स्वतःलाच खाणे आणि या प्रक्रियेमध्ये सुदृढ पेशी या डॅमेज पेशींना व पेशी घटकांना खातात. सेल बायोलॉजी मधील ही एक महत्वाची प्रक्रिया आहे की ज्यामुळे आपले शरीर निरोगी राहते व आजाराविरुद्ध लढू शकते.यावरून हे सिद्ध होते की उपवास आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक आहे.आपल्या शोधामध्ये योशिनोरी ओसुमी यांनी सांगितले की जर एखादी व्यक्ती वर्षातून वीस-पंचवीस दिवस रोज नऊ ते दहा तास उपवाशी राहील तर त्यामुळे कॅन्सरचे क्वांटम डॉट्स वेगाने कमी होतात.त्यामुळे कॅन्सरचा धोका राहत नाही.ऑटोफॅगी प्रक्रिया थांबल्यामुळे मधुमेह होण्याचा धोकासुद्धा वाढू शकतो.
*महात्मा बुद्ध म्हणतात,”जो मनुष्य आपल्या आहारावर नियंत्रण ठेवत नाही, तो मनुष्य आपल्या स्वास्थ्याचे रक्षण करू शकत नाही.”* जगातील सर्वच धर्मात कमी अधिक प्रमाणात उपवासाचे महत्त्व सांगितले आहे.
उपवास करणे म्हणजेच निराहार राहने होय. निराहार म्हणजे कोणत्याही पद्धतीचा आहार न घेणे. त्याचे सजल आणि निर्जल असे दोन प्रकार होतात.निर्जल उपवासात कोणत्याही प्रकारचा पदार्थ तर नाहीच परंतु पाणीही पिले जात नाही तर सजल उपवासात दिवसभर फक्त कोमट पाणी घेतले जाते.
एवढा कडक आणि काटेकोर उपवास आजकाल धावपळीच्या जगात कोणी ठेवत नाही याला पर्याय म्हणून हलका आहार घ्यावा त्यासाठी काही पर्याय सुचवलेले आहेत…
*उपवासात खानपान कसे ठेवावे ??:-*
1) गरम पाणी:- गरम पाणी औषधी आहे. पाण्यावर अग्निसंस्कार केल्याने पचायला हलके होते.जठराग्नी प्रज्वलित करते.जास्त फायदा होण्यासाठी सुंठ टाकून गरम करावे. पाव चमचा सुंठ अर्धा चमचा साखर मिळवून घेऊ शकतो.त्याने पित्त कमी होते.
2) गाईचे देशी तूप:- देशी गाईचे तूप हे अग्नीला वाढवते व पित्त कमी करते. तसेच बल, वर्ण वाढविणारे व मेंदूला बल देणारे आहे. उपवासाच्या पदार्थात वापरावे.
3) गाईचे दूध:- गाईचे दूध हे पचनास हलके असते. गरम दूध प्यावे. जीवनीय शक्ती देते. बल देते व थकवा कमी करणारे आहे.
4) फळांचे सेवन:-उपवासासाठी फळांचा खाण्यात समावेश करावा. फळ पचण्यास हलके असतात.फक्त दूध व फळं बरोबर एकाच वेळी खाऊ नये.विरुद्धाहार आहे.त्यामुळे सकाळी दूध घेतल्यास दुपारी फळ खावी.
5) ताक:- उपवासासाठी ताकाचा वापर करायला सांगितला आहे.जे खूप आंबट नाही व जास्त दिवसाचे नाही अशा ताकात जिरे,सुंठ व साखर टाकून घेऊ शकतात.त्याने पित्त कमी होते.
6) भाजलेले पदार्थ:-राजगिरासारखे भाजून लाही केलेले पदार्थ पचण्यास हलके असल्याने खाऊ शकतात.
*कोणते पदार्थ टाळावे ???:-*
1) तळलेले पदार्थ पचण्यास जड असल्याने टाळावे.
2) खव्यापासून बनवलेले पदार्थ,पेढे वगैरे तसेच नमकीन पदार्थही टाळावे.
3) साबुदाणा ची खिचडी,चकल्या वगैरे पदार्थ तसेच बटाटा व शेंगदाणे असे जड पदार्थ टाळावे.
4) म्हशीचे थंड दूध तसेच फ्रिज मधले पदार्थ पचण्यास जड असल्यामुळे टाळावे. तसेच दही अभिष्यंदि असल्यामुळे टाळावे.
*उपवास ठेवण्याचे फायदे:-*
*लंघने क्षपिते दोषे दिप्तेग्नि लाघवे सति l*
*स्वास्थम् क्षुतृडरूचि: पक्तिर्बलमोजस्य जायते ll*
*अ.हृ.सु.*
1)प्रतिकारशक्ती मजबूत होते:-
उपवास ठेवल्याने शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत होते. त्यामुळे शरीराची आजारांशी लढण्याची क्षमता वाढते.
2)पाचन संस्थेसाठी चांगले:-
महिन्यात कमीत कमी तीन वेळा उपवास ठेवल्याने पचन संस्था दुरुस्त होते.भूक तहान चांगली लागते.उपवासामुळे जठर तसेच यकृताला खूप आराम मिळतो.
3)स्मरणशक्ती वाढते:-
आपल्या मेंदूची स्मरणशक्ती वाढण्यासाठी पण उपवास खूप उपयुक्त आहे.जर आहार संतुलित असेल व आठवड्यातून एकदा उपवास ठेवला तर विचार करण्याची क्षमता व स्मरणशक्ती धारदार होते. याबरोबरच मेंदू शांत व स्वस्थ राहतो
4)वजन कमी होते:-
वजन कमी करण्याची ईच्छा असणाऱ्यांसाठी उपवास एक चांगला विकल्प आहे. उपवासामुळे शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते. उपवासामुळे भूकेवर नियंत्रण येते व वजन वाढण्याची शक्यता कमी होते.
5)डिप्रेशन(अवसाद) कमी होतो:-
उपवास मानसिक शांतीसाठी चांगला विकल्प आहे.त्यामुळे सत्वगुण वाढून चिंता व डिप्रेशन कमी होते तसेच इच्छाशक्ती मजबूत होते.
डॉ शशिकांत कापडणीस
आयुर्वेद विशेषज्ञ
वैद्यकीय अधिकारी,
ग्रामीण रुग्णालय सटाणा जि नाशिक
9766499233