भ्रमिष्ट लोकांची दाढी कटिंग , स्नान घालून केली जीवन जागृती नांदेड येथील सेवाभावी कायापालट उपक्रम
भ्रमिष्ट लोकांची दाढी कटिंग , स्नान घालून केली जीवन जागृती
नांदेड येथील सेवाभावी कायापालट उपक्रम
नांदेड प्रतिनिधी
*दुस-यासाठी जगला तो ख-या अर्थाने जगला या संतांच्या शिकवणी प्रमाणे धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर हे जीवन जगत असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध त्वचारोग तज्ञ डॉ. अर्जुन मापारे यांनी केले. ४७ व्या महिन्याच्या कायापालट उपक्रमात ॲड.ठाकूर यांनी ५२ भ्रमिष्टांची कटींग दाढी केल्यानंतर स्नान घालून नवीन कपडे, चहा फराळ व शंभर रुपयाची बक्षिसी दिली.*
दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी घेण्यात येणाऱ्या कायापालट उपक्रम पाहण्यासाठी डॉ. मापारे यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी बोलताना डॉ. मापारे असे म्हणाले की, समाजसेवा क्षेत्र म्हटले की,एकच नाव समोर येते ते म्हणजे दिलीपभाऊ ठाकूर यांचे. शंभरच्या आसपास उपक्रम ते सातत्याने राबवत असल्यामुळे करावे तितके कौतुक कमी आहे. यापुढे दरमहा भ्रमिस्टांच्या तपासणीसाठी मी येणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.भाजपा नांदेड महानगर, लायन्स क्लब नांदेड सेंट्रल,अमरनाथ यात्री संघ, सन्मित्र फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कायापालट उपक्रम अखंडित पणे घेण्यात येतो.यासाठी खा.अशोकराव चव्हाण,माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, खा.डॉ. अजित गोपछडे, मराठवाडा प्रदेश संघटन मंत्री संजय कोडगे,महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते,भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ.संतुकराव हंबर्डे व ॲड. किशोर देशमुख,ला. योगेश जैस्वाल यांचे मार्गदर्शन मिळत असते. सोमवारी पहाटे शहरातील विविध भागातून भ्रमिष्ट, कचरा वेचणारे, अपंग, बेघर नागरिकांना सुरेश शर्मा,संजयकुमार गायकवाड, शिवा लोट यांनी स्वतःच्या दुचाकी वर बसवून गोवर्धन घाट पुलाखाली आणले. स्वयंसेवक राजूअण्णा पस्पुनुर यांनी सर्वांची काळजीपूर्वक कटिंग दाढी केली.कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश लोट यांच्या सहकार्याने स्नान करण्याची व्यवस्था करण्यात आली. कित्येक दिवस आंघोळ न करणाऱ्या या नागरिकांना निलेश याने साबण लावून स्नान घातले.सुप्रसिद्ध त्वचारोग तज्ञ डॉ. अर्जुन मापारे, डॉ. दि.बा.जोशी, गुरुसिंह चौहान यांच्या हस्ते सर्वांना अंडरपॅन्ट, बनियन व पॅन्ट शर्ट वाटप करण्यात आले. ही भ्रमिष्ट मंडळी कायापालट होण्यासाठी तयार व्हावी म्हणून शंभर रुपयाची बक्षिसी व चहा फराळाची व्यवस्था केली होती.पूर्वीचे मळके कपडे,अवास्तव वाढलेले केस आणि नंतरची चकाचक करण्यात आलेली कटिंग दाढी व नवीन कपडे घातल्यामुळे उपेक्षितांचा झालेला कायापालट पाहून त्यांना स्वतःला नवल वाटले. डॉ. दि.बा. जोशी,डॉ. अर्जुन मापारे यांनी आजारी असलेल्या व्यक्तींची तपासणी करून मोफत औषधे दिली. याशिवाय जखमी असलेल्यांची मलमपट्टी केली. उपक्रम संपल्यानंतर गोवर्धन घाट परिसराची स्वच्छता करण्यात आली. दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी कायापालट हा उपक्रम राबविण्यात येत असल्यामुळे अशा बेघर व्यक्ती आढळल्यास सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या रविवारी त्याची माहिती द्यावी असे आवाहन संयोजक दिलीप ठाकूर यांनी केले आहे. (छाया: संजयकुमार गायकवाड, संघरत्न पवार)