*जळताना भुई पायतळी कवितासंग्रहावर ऑनलाईन परिसंवाद*
*जळताना भुई पायतळी कवितासंग्रहावर ऑनलाईन परिसंवाद*
सिन्नर प्रतिनिधी
कवी तान्हाजी बोऱ्हाडे लिखीत, काव्याग्रह प्रकाशन प्रकाशित ‘जळताना भुई पायतळी’ या कवितासंग्रहावर काव्याग्रह प्रकाशन यांच्यावतीने,रविवार दि. 14 जुलै रोजी दृकचित्र माध्यमातून (ऑनलाईन)परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.
ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक मा. श्री बाबाराव मुसळे हे परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी होते. आपल्या अध्यक्षीय भाषणातून या कवितासंग्रहाबद्दल भाष्य करताना मा. श्री. बाबाराव मुसळे म्हणाले की,”ही कविता केवळ कवीचा गाव ,त्यांचा परिसर, त्यांचा प्रदेश यांचेच प्रतिनिधित्व करत नाही तर, ती महाराष्ट्रातल्या तमाम कास्तकारांची ,कष्टकऱ्यांची, शेतमजुरांची प्रातिनिधिक स्वरूपात व्यथा- वेदना शब्दबद्ध करणारी कविता आहे.गावाकडे भोगलेले विविध दुःखस्तर या कवितेतून अत्यंत प्रभावी शब्दांतून साकार झालेले आहेत”.
तसेच
तसेच परिसंवादातील प्रमुख वक्ते म्हणून विवेचन करताना,
“ही कविता आपले रंजन करत नाही, आपल्याला सुखावत नाही तर ती वाचकाला अस्वस्थ करते. अनेक प्रश्न उपस्थित करणारी ही कविता आहे. श्रमसंस्कृतीला अविष्कृत करणारी ही कविता असून तिला मातीचा गंध आहे. पिढ्यान् पिढ्या मातीत राबणाऱ्या जगाची ही कविता आहे”. असे प्रतिपादन डॉ.केशव सखाराम देशमुख यांनी केले.
प्रसिद्ध कवी मा.श्री.किरण भावसार, परिसंवादातील भाष्यकार म्हणून कवितासंग्रहाबद्दल भाष्य करताना म्हणाले की,” ही कविता शेतीमातीत राबणाऱ्या कष्टकऱ्यांचा आवाज बनून आली आहे. वाचकाला अंतर्मुख करणं अस्वस्थ करणे हा या कवितेचा विशेष असा गुण आहे. ती वाचकाच्या मनात अनेक प्रश्न निर्माण करते. तिच्यातील सूचकता वाखाणण्याजोगी आहे”.
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून अनेक प्रसिद्ध लेखक, समीक्षक, कवी ,संपादक, भाषा अभ्यासक, वाचक यांची कार्यक्रमासाठी ऑनलाईन उपस्थिती होती.
श्री विठ्ठल पांडे यांनी कार्यक्रमांचे सूत्रसंचालन केले.तर संयोजक आणि काव्याग्रह प्रकाशनाचे श्री विष्णू जोशी यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
तसेच श्री चंद्रकांत भोसले यांनी दृकाचीत्र माध्यमाचे तांत्रिक व्यवस्थापन पाहिले.