ताज्या घडामोडी

*आनंदाची बातमी! विद्यार्थ्यांना एसटी पास आता थेट शाळेत मिळणार!*


*आनंदाची बातमी! विद्यार्थ्यांना एसटी पास आता थेट शाळेत मिळणार!*

 

 

*किरण घायदार*

नाशिक

 

शाळा – महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी- विद्यार्थिनींसाठी एक आनंदाची बातमी आहे. अनेक विद्यार्थ्यांना आपल्या घरापासून शाळा किंवा कॉलेजला जाण्यासाठी एसटीने प्रवास करावा लागतो. अशा विद्यार्थ्यांना आता एसटीचे पास थेट त्यांच्या शाळेत देण्यात येणार आहेत. तशा सूचना एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी दिल्या आहेत. त्याची अंमलबजावणी स्थानिक एसटी प्रशासनाकडून केली जाईल. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. शिवाय रांगेत उभे राहून पास घेण्याची वेळ त्यांच्यावर येणार नाही.

नवीन वर्षाच्या पहिल्या सत्रातील शाळा आता सुरू झाल्या आहेत. घरापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी सरकारने विद्यार्थ्यांना एसटीच्या माध्यमातून 66% इतकी सवलत दिली आहे. याचा थेट फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे. त्यामुळे त्यांना केवळ 33% रक्कम भरून मासिक पास काढता येतो. त्याचप्रमाणे सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना मोफत एसटी पासचे वितरण केले जाते. यासाठी विद्यार्थी विद्यार्थिनींना एसटीच्या पास केंद्रावर जाऊन रांगेत उभे राहून पास काढावा लागतो. तर काही ठिकाणी ग्रुपने एसटी आगारात जाऊन आगार व्यवस्थापन कडून पास घेतले जातात.

Advertisement

पण या वर्षापासून विद्यार्थ्यांना पास साठी आता रांगेत ताटकळत उभे राहावे लागणार नाही. त्यांच्या शाळा -महाविद्यालयांनी पुरवलेल्या यादीनुसार एसटीच्या कर्मचाऱ्याकडून त्या विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना त्यांचे एसटी पास थेट शाळेत देण्यात येणार आहेत. यामुळे त्यांचा वेळ वाया जाणार नाही. या संदर्भात 18 जुन पासुन एसटी प्रशासनातर्फे ‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’ ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्या आधी सर्व शाळा महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक आणि प्राचार्यांनी एसटीच्या आगार व्यवस्थापकांना पत्र द्यायचं आहे. त्यात आपल्या शाळेत नवीन वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थ्यांची यादी द्यायची आहे. या अभिनव योजनेचा लाभ राज्यभरात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी- विद्यार्थिनींना होणार आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *