घोटीवाडीत महिला बनवतात लाकडी घाण्याद्वारे नैसर्गिक तेल
शासनाच्या योजनेमुळे अन्नपूर्णाच्या महिलांना मिळाले जगण्याचे बळ
लक्ष्मण सोनवणे बेलगाव कुऱ्हे :
शासनाच्या महत्वकांक्षी योजनेचे अतिशय सकारात्मक असे परिणाम साध्य होतांना दिसत असून बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय ग्रामीण परिवर्तन योजनेच्या माध्यमातून अन्नपूर्णाच्या महिलांना उद्योग व्यवसायात जीवन जगण्याचे बळ मिळाले आहे. इगतपुरी तालुक्यातील घोटीवाडीजवळ दहा महिलांनी एकत्र येऊन वूमन्स पॉवर फार्मस प्रोड्युसर या शेतकरी कंपनीच्या महिला सदस्यांनी शासनाच्या योजनेचा लाभ घेऊन अन्नपूर्णा लाकडी घाण्याद्वारे विविध नैसर्गिक तेल बनवण्याचा उद्योग सुरू केला आहे.
शेंगदाणा तेल 340 रुपये किलो, शूध्द खोबरेल तेल 340 रुपये किलो, मोहरी तेल 60 रुपये 100 एमएल, तिळ तेल 580 रुपये किलो अशा भावाने विक्री होते. यामुळे रोजगाराला चालना मिळण्यास मोठी मदत झाली. कंपनीच्या अध्यक्षा मथुरा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पाचशे शेतकरी एकत्र आले त्यांनी तालुक्यात शंभर बचत गटाची स्थापना करून महिलांना स्वयंमरोजगारासाठी प्रवृत्त केले. हिरवा मसाला, भाजणीचे थालीपीठ, हातसडीचा तांदूळ, सेंद्रिय गूळ आदी विक्री केली. कंपनीत 265 महिला सदस्य आहेत. अन्न पूर्ण महिला बचत गट 2006 मध्ये कार्यरत होता त्याच महिलांनी एकत्र येऊन बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय ग्रामीण परिवर्तन योजनेच्या माध्यमातून स्मार्ट प्रकल्पामार्फत १ कोटी ११ लाख 86 हजार मंजूर असून 43 लाख २५ हजार अनुदान त्यांना मिळाले व स्वतःच्या पायावर महिला भक्कम उभ्या राहिल्या आहेत. योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी इगतपुरी कृषी विभागाने मदत केली. या कंपनीत दहा तेल घाणे असून त्या विविध प्रकारचे तेल बनवतात. अध्यक्षा मथुरा जाधव या अगोदर बचत गटातून सेंद्रिय गूळ हातसडीचा तांदूळ विक्री करीत होत्या. त्यांच्या मनात कल्पना येताच त्यांनी हा उद्योग व्यवसाय सुरू केल्याने तालुक्यातून कौतुक होत आहे. अन्न पूर्णा महिला बचत गटाला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. या कंपनीत विमल कचरू डुकरे, सीमा विजय कर्डक, सुमन घोडे, दीपाली सरोदे सावित्रीबाई म्हसने, अनिता परदेशी, सुलोचना भुसेकर, साधना भगत, संगीता बिन्नर आदी महिला संचालक आहेत
“घरची परिस्थिती हलाखीची होती. पैसा जगात सर्व काही असल्याचा प्रत्यय मुलगा आजारी पडल्यानंतर आला. कर्जबाजारी झाले होते मात्र झालेले कर्ज फेडले. माझे पाचवीपर्यंत शिक्षण झाले असून मुलांना शिकवले. एकीचे बळ मिळते फळ या उक्तीप्रमाणे आम्ही महिला भगिनी एकत्र येऊन कंपनी स्थापन केली. इतर महिलांनी हताश न होता मेहनत केल्यास त्याचे फळ नक्कीच मिळेल. शिक्षण झाले नाही याची खंत मनात होती त्यामुळे मूलाच्या शिक्षाणाकडे लक्ष दिले. बचत गटांच्या माध्यमातून स्वावलंबी बनुन दोन्ही मुले इंजिनिअर असून अँमेझॉन सारख्या कंपणित रीजनल मॅनेजर म्हणून राज्यलेवलर कार्यरत आहे.”
-मथुरा जाधव,
अध्यक्ष वूमन्स पॉवर फार्मस प्रोड्युसर