महाराष्ट्र

एक  झुंजार व्यक्तिमत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर


एक  झुंजार व्यक्तिमत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर

*थोर विचारवंत, भारतीय घटनेचे शिल्पकार, कृतिशील राजकारणी, उत्तम संसदपटू, अभ्यासू विचारवंत,सखोल चिकित्सक, संपादक,उत्तम पत्रकार, उत्तम लेखक, उत्तम वक्ते,जलतज्ञ, महान कायदेपंडित, संस्कृत महाकाव्याचा नायक, प्रखर राष्ट्रनिष्ठा असलेले थोर व्यक्तिमत्व, थोर समाज सुधारक, थोर शिक्षणतज्ञ, आदर्श विद्यार्थी, राजनीतीतज्ञ असे अनेक पैलू असलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. आज त्यांची १३३ वी जयंती. त्यानिमित्त त्यांच्या जीवन कार्याविषयी मागोवा.*

भारतीय घटनेचे शिल्पकार, भारताच्या राज्यघटनेत अस्पृश्यतेला थारा नाही.अस्पृश्यता समूळ नष्ट करण्यासाठी व दलितांच्या उद्धारासाठी आयुष्यभर झटणारे

झुंजार व्यक्तिमत्व डॉ. बाबासाहेब

आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ मध्ये मध्यप्रदेशातील महू या गावी झाला.त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते.आईचे नाव भिमाबाई व वडिलांचे नाव रामजी होते.मुळगाव रत्नागिरीजिल्ह्यातील आंबावडे हे होय.त्यांचे वडील लष्करात सुभेदार म्हणून नोकरीस होते पुढे ते सातारा येथे स्थायिक झाले. त्यामुळे बाबासाहेबांचे बालपण सातारा येथेच गेले.

बाबासाहेबांचे प्राथमिक ते मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण दापोली,सातारा व मुंबई येथे झाले. १९०७ मध्ये मुंबईच्या एल्फिस्टन हायस्कूलमधून ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. अगदी बालपणापासूनच अस्पृश्यतेकचे चटके बसले होते.वर्गातील बरोबरीच्या मुलांकडून त्यांना सतत अवहेलना सहन करावी लागत. इ.स. १९१२ मध्ये ते एलफिस्टन कॉलेज मधून बीए ची परीक्षा उत्तीर्ण झाले. इ.स. १९१३ मध्ये सयाजीराव गायकवाड यांनी आर्थिक साह्य केल्याने उच्च शिक्षणासाठी अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातून इ.स. १९१५ मध्ये एम.ए ची पदवी संपादन केली.इ.स. १९१६ मध्ये पी.एचडी ही पदवी मिळवली. पुढे कायदा व अर्थशास्त्रयांचे अध्ययन करण्यासाठी इंग्लंडला गेले.परंतु आर्थिक अडचणीमुळे त्यांना शिक्षण अर्धवट सोडून भारतात परतावे लागले.बाबासाहेबांनी सार्वजनिक कार्यास सुरुवात केली. इ.स.१९२० मध्ये ‘मूकनायक’हे पाक्षिक सुरु केले. इ.स.१९२०मध्ये कोल्हापूर संस्थानातील माणगाव या गावी भरलेल्या अस्पृश्यता निवारण परिषदेमध्ये भाग घेतला. त्या सभेला राजश्री शाहू महाराजांनी बाबासाहेबांचा गौरव केला. १९२० मध्ये ‘‘दि प्रॉब्लेम ऑफ रुपी‘‘ या त्यांच्या प्रबंधाबद्दल लंडन

विद्यापीठाने डी एस्.सी ही पदवी बहाल केली.१९२४ मध्ये भारतात अस्पृश्यांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी ‘‘बहिष्कृत हितकारिणी सभा‘‘ या संस्थेची स्थापना केली इ. स. १९२७ मध्ये त्यांची मुंबई प्रांताच्या कायदेमंडळाच्याचे सदस्य म्हणून नियुक्ती झाली. बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांसाठी केलेली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी आपल्या अस्पृश्य बांधवांना अन्यायाचा प्रतिकार करण्यास आणि न्याय हक्कासाठी संघर्ष करण्यास शिकवले. अस्पृश्य हे देखील याच देशाचे नागरिक आहेत आणि या देशावर इतर कोणाही इतकाच अस्पृश्यांनाही अधिकार आहे. असे त्यांनी ठासून सांगितले.‘मनुस्मृती या हिंदू धर्म ग्रंथाने जन्माधिष्ठित वर्णव्यवस्थेचे समर्थन करून सामाजिक विषमता व उच्च-नीच

भेदभाव याचे समर्थन करणार्‍या या ग्रंथाचा प्रतीकात्मक निषेध म्हणून २५ डिसेंबर १९२७ रोजी मनुस्मृतीचे जाहीररीत्या दहन केले.अस्पृश्याना मंदिर प्रवेश नाकारला जात होता. म्हणून नाशिक येथे आपल्या हजारो अनुयायांनी सोबत २ मार्च १९३० रोजी काळाराम मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह केला. उच्चवर्णीयांनी अस्पृश्यांना वर्षानुवर्षे त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवले असले तरी यापुढे अस्पृश्य बांधव हा अन्याय सहन करणार नाही ते आपल्या न्याय हक्कासाठी प्रसंगी

संघर्ष देखील करतील आणि आपले

हक्क मिळवलेल्याखेरीज स्वस्थ बसणार नाही आणि यातूनच अस्पृश्यांची अस्मिता जागी झाली. हिंदू धर्माने अस्पृश्यांना न्याय द्यावा. याकरिता आंबेडकरांनी सर्व प्रकारचे

प्रयत्न केले तरी हिंदूंच्या वृत्तीत फारसा फरक पडला नाही या अनुभवावरून त्यांची खात्री पटली की,अस्पृश्यांना सवर्ण हिंदू कधीच न्याय देणार नाही म्हणून त्यांनी धर्मांतर करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे आपल्या हजारो अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. या धर्मांतरामध्ये बौद्ध धर्माची निवड करण्यात देखील आंबेडकरांचे दूरदर्शीत्व व राष्ट्रहिताची तळमळ याचे दर्शन होते. शेतीला उद्योग मानून पायाभूत सुविधा पुरवून शेतकर्यांचा आर्थिक विकास झाला पाहिजे. आर्थिक स्रोत तळागाळापर्यंत झिरपले म्हणजे ग्रामीण माणसाच्या मानसिकतेत सकारात्मक बदल घडतील. आर्थिक विषमता जितकी कमी होईल, तितकी जातीय भेदभावाची दरी कमी

Advertisement

होईल, असे बाबासाहेबांना वाटत होते. डॉ.आंबेडकर यांनी सर्वांत महत्त्वाची संकल्पना मांडली ती शेतीचे राष्ट्रीयकरण करण्याची. पीकपद्धती, पाणी उपलब्धता, बांधबंदिस्ती, उत्पादकता वाढ, साठवण व्यवस्था, शेतमालाची विक्री, शेतमालाचे भाव या संदर्भात स्पष्ट नियम करावेत, असे त्यांचे स्पष्ट मत होते.डॉ.आंबेडकर यांच्या काही संकल्पनातूनच कमाल जमीनधारणा

कायदा, सावकारी व खोती पद्धतींना

प्रतिबंध करणारा कायदा, सामूहिक शेतीचे प्रणालीवर आधारित शेती महामंडळ,राज्यातील नद्यांच्या खो-याची विभागणी व विकास, जलसंवर्धन योजना अमलात आल्या.

डॉ. आंबेडकर यांनी

भारतीय राजकारणातही अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली होती इ.स.सन १९२० ते १९३२ या दरम्यान इंग्लंड मध्ये भरलेल्या गोलमेज परिषदांना ते अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते.त्याठिकाणी त्यांनी अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली. इ.स. १९३२ मध्ये इंग्लंडचे पंतप्रधान रॅम्से मॅकडोनाल्ड यांनी आंबेडकरांची मागणी मान्य केली. महात्मा गांधीजींचा अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यास विरोध होता स्वतंत्र मतदार संघाच्या निर्मितीमुळे अस्पृश्य समाज उर्वरित हिंदू समाजापासून दूर जाईल असे त्यांना वाटत होते. त्यामुळे जाती निवाड्यातील या तरतुदीच्या विरोधात महात्मा गांधीजींनी येरवडा तुरूंगात प्राणांतिक उपोषण सुरू केले याप्रसंगी गांधीजींचे प्राण वाचावेत म्हणून डॉ. आंबेडकर तडजोडीला तयार झाले. त्यानुसार महात्मा गांधी व डॉ.आंबेडकर यांच्या २५ सप्टेंबर १९३२ रोजी एक करार झाला हा

करार ‘पुणे करार’ या नावाने इतिहासात ओळखला जातो.भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारताच्या घटना समितीचे सभासद होते आणि घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली होती. त्यांनी अतिशय परिश्रम पूर्वक

भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार केला.आणि त्या योगी भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीत सिंहाचा वाटा उचलला म्हणूनच त्यांचा

‘भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार’ अशा शब्दात उचित गौरव केला जातो.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पं.नेहरू यांची त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये डॉ.आंबेडकर यांच्यावर केंद्रीय कायदा मंत्री म्हणून जबाबदारी सोपवली. या नात्याने त्यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक ‘हिंदू कोड बिल’ तयार केले. त्यामुळे त्यांना ‘आधुनिक मनू’ असेही म्हटले जाते.अस्पृश्यांना शिक्षण मिळाल्याखेरीज त्यांची प्रगती होऊ शकणार नाही,हे बाबासाहेबांनी

ओळखले होते. म्हणूनच त्यांनी शिक्षण प्रसाराच्या कार्यातही लक्ष घातले होते. त्यांनी स्थापन केलेल्या ‘बहिष्कृत हितकारिणी सभा’ या संस्थेमार्फत दलित समाजातील तरुण

व प्रौढ व्यक्तींसाठी रात्रशाळा चालविणे,वाचनालय सुरु करणे यासारखे उपक्रम हाती घेतले होते.१९४७ मध्ये बाबासाहेबांनी ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी’ या संस्थेची स्थापना केली. तिच्या माध्यमातून शाळा,महाविद्यालये सुरू करून दलित विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे बांधली.

डॉ.आंबेडकर यांनी दलित समाजाला न्याय्य हक्क मिळविण्यासाठी ‘शिका! संघटित व्हा!! संघर्ष करा!!!’ असा मूलमंत्र देऊन त्यांना मुख्य प्रवाहाशी जोडून आणि भारताची राज्यघटना तयार करून भारतीय जनतेला स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही उद्दिष्टे देऊन आपल्या भारत देशाची ‘न भूतो न भविष्यति’ अशी फार मोठी सेवा केली आहे. या महान देशसेवेप्रति कृतज्ञता म्हणून त्यांच्या जन्मशताब्दी महोत्सवाचा योग साधून १४ एप्रिल १९९० ला त्यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला. त्यांना हा पुरस्कार दिल्यामुळे या सन्मानाची महानता वाढली आहे. अशा या महान महामानवाचे ६ डिसेंबर १९५६ ला दिल्ली येथे महापरिनिर्वाण झाले.

या थोर विभूतीस कोटी कोटी प्रणाम ! ओम् शांती!

 

 

बाळासाहेब दादा सोनवणे सर,

उपशिक्षक, मातोश्री गिताबाई देवराम पाटील माध्यमिक विद्यालय,महिरावणी ता.जि. नाशिक

मोबा. ८०५५३७०९७७

ई-मेल- [email protected]


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *