क्राईम

युवक हा पक्षाचा मुख्य पाया,त्यासाठी पक्षात युवकांचे संघटन अतिशय महत्वाचे ; अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली महिला, युवक, युवतींचे  संघटन अभूतपूर्व – मंत्री छगन भुजबळ


युवक हा पक्षाचा मुख्य पाया,त्यासाठी पक्षात युवकांचे संघटन अतिशय महत्वाचे

अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली महिला, युवक, युवतींचे  संघटन अभूतपूर्व – मंत्री छगन भुजबळ
मंत्री भुजबळ म्हणतात :-छत्रपती, फुले, शाहू, आंबेडकरांची विचारधारा आजही कायम
पक्ष, समाज आणि देश म्हणून पुढे जात असतांना सर्व समाजघटकांना सोबत घेऊन काम करावे
पुणे  प्रतिनिधी
युवक हा पक्षाचा मुख्य पाया असून अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली महिला, युवक युवतींच अभूतपूर्व संघटन होत आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन पाठिंबा दिला आहे. आगामी निवडणुकांमध्ये आपल्याला अधिक कष्ट करावे लागतील. त्यासाठी आगामी लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपल्याला जोमाने काम करावे लागेल. पक्षात काम करत असतांना सर्वसमाज घटकांना सोबत घेऊन काम करावे असे आवाहन राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज बालेवाडी पुणे येथे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पार्टीचा युवा मिशन महामेळावा आयोजित करण्यात आलेला होता. या प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे,रामराजे निंबाळकर, मंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री धनंजय मुंडे, मंत्री अनिल भाईदास पाटील, मंत्री संजय बनसोडे, मंत्री अदितीताई तटकरे, आमदार आशुतोष काळे, आमदार अमोल मिटकरी, चेतन तुपे, सुनील टिंगरे, सुनील शेळके, डॉ किरण लाहमटे,अनिकेत तटकरे, मुंबई अध्यक्ष समीर भुजबळ, माजी खासदार आनंद परांजपे,पार्थ पवार, शिवाजीराव गर्जे, उमेश पाटील, रुपालीताई ठोंबरे, युवक अध्यक्ष सुरज चव्हाण यांच्यासह युवक बहुसंख्येने उपस्थित होते.
युवकांना संघटीत करण्याचे काम अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली युवक अध्यक्ष सुरज चव्हाण यशस्वीरित्या करत त्याबद्दल त्यांचे कौतुक करत मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, काही दिवसांपूर्वी मुंबईत मुंबई अध्यक्ष समीर भुजबळ यांचा मुंबई विभागाचा मेळावा पार पडला. त्यानंतर महिला अध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांचा महिलांचा मेळावा पार पडला. या दोन्ही मेळाव्यात सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर बसायला देखील जागा मिळाली नाही. आज अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात युवकांचा मेळावा पार पडतोय. या मेळाव्याला युवकांचा प्रचंड असा प्रतिसाद लाभत आहे. हा मिळणारा प्रतिसाद बघता आमच्या जुन्या मित्रांनी आणि नेत्यांनी जरा पुनर्विचार करण्याची आवश्यकता आहे. पुनर्विचार होत नसेल तर किमान थांबल पाहिजे बोलणे थांबविले पाहिजे अशी भूमिका त्यांनी मांडली.
 ते म्हणाले की, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या जन्मापासून मी होतो. अगदी पक्षाचा पहिला प्रांत अध्यक्ष म्हणून मी काम केल. त्यांनंतर आज अजितदादा यांच्या सोबत बाजूला निघाल्यानंतर सुरवातीच्या काळात अनेक मेळावे देखील झाले. अगदी कमी कालावधीत अजित दादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात महिला, युवक, युवतींच संघटन होतंय ते अभूतपूर्व असून त्याचा विचार सर्वांनी करायला हवा. स्वामी विवेकानंद म्हणायचे की युवकांनी एखादी भूमिका घेतली तर सरकार दरबारी देखील त्याची दखल घ्यावीच लागते. त्यामुळे आताचे संपूर्ण राजकारण हे तरुणांच्या हातात आहे. त्यामुळे युवकांच योगदान या राष्ट्रकार्यासाठी व महाराष्ट्र कार्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या नेतृत्वाखाली आपल्याला द्यायचं आहे.
 ते म्हणाले की, युवक हा पक्षाचा पाया आहे. तरुणांच्या जीववार राजकारण समाजकारण करता येईल. त्यामुळे युवकांचे संघटन हे अतिशय महत्वाचे आहे. हे तरुण पगारी नको तर ते स्वयंमस्पुर्तीने येणे आवश्यक आहे. ते आज अजितदादांच्या नेतृत्वाखाली स्वयंमस्पुर्तीने जोडले जात आहे. मात्र जामखेड येथे एक युवक आहे ते या स्वतःला या राज्यातील तरुणांचे नेतृत्व समजतात त्यांच्या अवतीभवती मात्र पगारदारांचीच गर्दी पाहायला मिळते अशी टीका त्यांनी नाव न घेता केली.
ते म्हणाले की, पक्षाच्या सर्वाधिक आमदार, खासदार आणि पदाधिकारी यांनी निर्णय घेतला आणि अजितदादाच्या नेतृत्वाखाली एकत्र आले. त्यामुळे पक्षाचे चिन्ह, झेंडा आणि नाव मिळालं. तरी देखील काही लोक आम्हाला पक्ष चोराला असे म्हणता आहे. परंतु आपण लोकशाहीत राहतो. त्यामुळे पक्षाला सत्तेत यायचं असेल तर लोकांचा पाठींबा लागतो. त्यासाठी पक्ष मजबूत असायला हवा. अजितदादांच्या नेतृत्वाखाली पाठीशी सर्वाधिक लोक असल्यानेच पक्षाचे चिन्ह, झेंडा आणि नाव आपल्याला मिळालं. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीत सिंहाचा वाटा आपला पहिल्यापासून होता आणि आजही असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, अनेक लोक आमच्यावर टीका करतात. परंतु आम्ही कालही छत्रपती, फुले, शाहू आंबेडकर यांच्या विचारधारेवर काम करत होतो आणि आजही करत आहोत. आम्ही शिवसेनेबरोबर सत्तेत गेलो तेव्हा देखील आमची विचारधारा कायम होती आणि आज भाजप सोबत गेल्यावरही आमची विचारधारा कायम असल्याचा टोला विरोधकांना लगावला. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या विकासाचा जो रोडमॅप दाखवला आहे. या रोडमॅपवर अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली आपण काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, सध्या राज्यात आरक्षणाच्या प्रश्नांवर वातावरण ढवळून निघालं आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमचा कालही विरोध नव्हता आणि उद्याही नसणार आहे. त्यांना स्वतंत्र आरक्षण देण्यात याव हीच सर्वांची भूमिका आहे. पृथ्वीराज चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणासाठी कायदा केला त्यालाही आम्ही पाठींबा दिला. आता १५ फेब्रुवारी रोजी मराठा समाजाला स्वतंत्रपणे आरक्षण देण्यासाठी अधिवेशन बोलविण्यात आले आहे. या अधिवेशनात देखील आम्ही मराठा समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. आपल्या बरोबर अनेक समाज आहे. पक्ष म्हणून, देश म्हणून आणि समाज म्हणून पुढे जात असतांना सर्व समाजाला सोबत घेऊन पुढे जावे लागणार आहे.
ते म्हणाले की, अजितदादा यांना मुख्यमंत्री बनवायचे आपले जे स्वप्न आहे. त्यासाठी अल्पसंख्यांक, बारा बलुतेदार, भटके, आदिवासी, विमुक्त, दलित, ओबीसी यांच्या सर्वांची शक्ती आपल्या सोबत घेऊन जायचे आहे. कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही ही आपली भूमिका आहे. त्यादृष्टीने आपल्याला वाटचाल करायची असून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी हा राज्यातील क्रमांक एकचा पक्ष म्हणून पुढे आला पाहिजे अशी साद त्यांनी युवकांना घातली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *