गर्दीचा उच्चांक :तब्बल ७० किमीची रांग मराठ्यांचा पुणे शहराला वेढा, मुंबईत विश्व विक्रम होणार असल्याची नांदी
गर्दीचा उच्चांक :तब्बल ७० किमीची रांग
मराठ्यांचा पुणे शहराला वेढा, मुंबईत विश्व विक्रम होणार असल्याची नांदी
आपली दुनियादारी
हक्काचे आरक्षण घेणारच आणि तेही पन्नास टक्क्याच्या आतच अशी शपथ घेऊन मनोज जरांगे पाटील यांच्या हाकेला प्रतिसाद देऊन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मराठा बांधव मुंबईकडे मजल दर मजल प्रस्थान करीत आहे. भुईचे अंथरून आणि आभाळाचे पांघरून घेऊन जागा मिळेल तिथे थंडीने कुडकुडत रात्र काढीत दुसऱ्या दिवशी ताज्या उमेदीने पुढच्या प्रवासाला निघत आहे.
चाळीस वर्षांपासून सुरु असलेल्या या संघर्षाला सात महिन्यापूर्वी मनोज जरांगे या मावळ्याने नवी आशा, नवी दिशा दिली आणि संयमी मराठा पुन्हा इर्षेने पेटून उठला आहे. आंतरवली सराटी येथून २० जानेवारीला सुरु झालेला हा प्रवास पहिल्याच दिवशी सतरा किलो मीटर रांग दर्शवून गेला. आज तिसरा दिवस संपत असतांना पुणे शहर अगदी टप्प्यात आले तेंव्हा हीच रांग ७० किलोमीटर पर्यंत विस्तारत गेली. या प्रवासात पुणे शहराच्या दिशेने लाखो मराठ्यांचा समुदाय शिस्तबद्ध जरांगे पाटील यांच्या प्रवाहात सामील होत आहे.छत्रपतींचे मावळे मुघलांच्या साम्राज्याला वेढा घालून ज्या निष्ठेने स्वराज्यासाठी लढत होते त्याच निष्ठेने हा समाज स्वकीयांशी आपले हक्क मिळविण्यासाठी लढत आहे. पुणे शहराच्या सीमेवर झालेल्या गर्दीचा हा उच्चांक मुंबईत विश्व विक्रम करणार आणि विजयाचा गुलाल उधळूनच माघारी परतणार याची खात्री आता व्यवस्थेत बसलेल्या मुत्सुद्यानाही पटू लागली आहे.