क्राईम

पत्रकारितेची दशा आणि दिशा – भाग ३७ : प्रांजळ मत


पत्रकारितेची दशा आणि दिशा – भाग ३७ : प्रांजळ मत …

…….

अलीकडच्या काळात पत्रकारितेच्या मूल्यांचे सातत्याने होत असलेले अवमूल्यन थांबावे, पत्रकारितेतील पवित्रता, नैतिकता आणि सामाजिक उत्तरदायित्व पुन्हा अधोरेखित व्हावे, या शुद्ध आणि प्रामाणिक हेतूने “पत्रकारितेची दशा आणि दिशा” ही लेखमाला सुरू करण्यात आली आहे.

गेल्या तब्बल ३५ वर्षांच्या पत्रकारितेतील प्रवासात अनेक प्रवृत्ती जवळून पाहिल्या…

अनेक चेहरे अनुभवले…

काही प्रसंग सोसले…

काही संघर्ष जगले…

तर काही वास्तव मनाला अस्वस्थ करून गेले.

या सगळ्या अनुभवांतून समाजासमोर पत्रकारितेचे बदलते स्वरूप मांडण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.

ही मालिका कुणावर वैयक्तिक टीका करण्यासाठी नसून, पत्रकारितेतील विकृत प्रवृत्ती, वाढती दुकानदारी, दबावतंत्र, नैतिकतेचा ऱ्हास आणि सत्तेच्या सावलीत वाढणाऱ्या प्रवाहांवर भाष्य करण्यासाठी आहे.

लेखन अधिक परिणामकारक, वाचनीय आणि रसाळ व्हावे यासाठी कधी कधी काही विशेषणांचा, काही उपरोधिक उल्लेखांचा किंवा काही रुपकात्मक शब्दांचा जाणीवपूर्वक वापर करावा लागतो.

साहित्यिक आणि संपादकीय लेखनाचा तो एक भाग असतो.

मात्र, दुर्दैवाने काही वेळा एखादा शब्द, एखादे विशेषण किंवा एखादे रुपक हे समाजातील एखाद्या विद्यमान नावाशी न कळत साधर्म्य दाखवते.

मात्र अशा शब्दांचा कोणत्याही व्यक्तीशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध नसतो आणि नसल्याचे स्पष्टपणे नमूद करणे आवश्यक वाटते.

“पत्रकारितेची दशा आणि दिशा” या मालिकेच्या ३७ व्या भागातही काही असे संदर्भ आले आहेत.

Advertisement

त्या संदर्भांचा पत्रकारितेतील किंवा सामाजिक क्षेत्रातील कोणत्याही विद्यमान नावांशी, व्यक्तींशी किंवा घटनांशी कोणताही संबंध नाही.

मात्र हा भाग प्रसिद्ध झाल्यानंतर आणि मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर, काही दिवसांपूर्वी नाशिक शहरात घडलेल्या दोन घटनांशी या भागाचा संबंध जोडण्याचा प्रयत्न अनेकांनी फोनद्वारे केला.

काहींनी त्या घटनांतील नायक-खलनायक आणि या लेखातील रुपकात्मक उल्लेख यांच्यात साम्य शोधण्याचाही प्रयत्न केला.

परंतु हे स्पष्टपणे नमूद करण्यात येते की —

त्या दोन्ही घटनांचा, त्या घटनांतील व्यक्तींचा, त्यांच्याशी संबंधित नावांचा किंवा सध्या कायद्याच्या दरबारात कारवाईच्या प्रतीक्षेत असलेल्या कोणत्याही प्रकरणांचा या लेखमालेच्या ३७ व्या भागाशी यत्किंचितही संबंध नाही.

या लेखात वापरलेली रुपके ही केवळ साहित्यिक शैलीचा भाग आहेत.

“नाना”, “काका”, “दादा”, “भाऊ” जशी सर्वसाधारण संबोधनं असतात, तसाच तो उल्लेख समजावा.

मात्र एक गोष्ट निश्चित घडली —

या निमित्ताने समाजात दडलेल्या काही प्रवृत्तींची चर्चा रंगली…

काही घटनांचे अनेक पैलू समोर आले…

आणि काही तथाकथित नायक-खलनायकांचे चेहरेही जनतेसमोर उघडे पडले.

त्यांचा समाचार योग्य वेळी आणि स्वतंत्रपणे घेतलाच जाईल.

कारण पत्रकारितेचा उद्देश व्यक्तीविशेष नव्हे, तर प्रवृत्ती उघड करणे हा असतो.

पुन्हा भेटूच…

पत्रकारितेच्या दशेला दिशा देण्यासाठी…

या क्षेत्रातील चांगुलपणाचा दिवा विझू नये म्हणून…

आणि समाजासमोर सत्याचे आरसे स्वच्छ राहावेत म्हणून…!!

 

– दुनियादारी Won’t Lie


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *