महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट आणि गाईड्सच्या राज्यस्तरीय राज्य पुरस्कार चाचणी शिबिरात वाजे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग
महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट आणि गाईड्सच्या राज्यस्तरीय राज्य पुरस्कार चाचणी शिबिरात वाजे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग
सिन्नर (ता. सिन्नर) :
महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट आणि गाईड्स यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय राज्य पुरस्कार चाचणी शिबिर नुकतेच हस्तीभवन दोंडाईचा ता.शिंदखेडा जि.धुळे येथे उत्साहात पार पडले. या महत्त्वपूर्ण शिबिरात लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालय, सिन्नर येथील स्काऊट व गाईड विद्यार्थ्यांनी अत्यंत शिस्तबद्ध, उत्स्फूर्त आणि जबाबदारीपूर्ण सहभाग नोंदवला.
या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांची विविध अंगांनी कसोटी घेण्यात आली. स्काऊट-गाईड चळवळीतील मूलभूत नियम, ध्वजविधी, प्रार्थना, गाठबंधन, प्राथमिक उपचार, आपत्ती व्यवस्थापन, समाजोपयोगी सेवा, पर्यावरण संवर्धन तसेच नेतृत्वगुण या विविध घटकांवर विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यात आले. हर्षल मोरे, मिलिंद फड, प्रणव मोगल, आदित्य धोत्रे या वाजे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्रत्येक चाचणीत आत्मविश्वासाने सहभाग घेत उत्कृष्ट कामगिरी सादर केली.
शिबिरादरम्यान विद्यार्थ्यांना शिस्त, स्वयंसेवा, सहकार्य, देशप्रेम आणि सामाजिक बांधिलकी यांचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजले. विविध उपक्रमांतून त्यांनी संघभावना जपत कार्य पूर्ण केले. त्यांच्या वर्तनात दिसून आलेली शिस्त, वेळेचे काटेकोर नियोजन आणि सेवाभावी वृत्ती उपस्थित परीक्षक व मार्गदर्शकांच्या विशेष प्रशंसेस पात्र ठरली.
या यशस्वी सहभागामागे विद्यालयातील मनोहर सोनवणे, शांताराम चांदोरे, मनीषा बनकर, सुनिता गोजरे, वंदना पावसे या स्काऊट-गाईड शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. विद्यालय प्रशासनानेही विद्यार्थ्यांना आवश्यक ते सहकार्य व प्रोत्साहन दिले. या सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे सिन्नर तालुका संचालक कृष्णाजी भगत यांनी अभिनंदन केले. तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक रामनाथ रायते, उपमुख्याध्यापिका मंगल हांडे, पर्यवेक्षक पांडुरंग करपे, विजयानंद कुमावत यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले.
राज्य पुरस्कार चाचणी शिबिरातील वाजे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग हा विद्यालयासाठी कौतुकास पात्र असून असून, भविष्यातील स्काऊट-गाईड चळवळीतील त्यांच्या उज्ज्वल वाटचालीसाठी हा सहभाग निश्चितच दिशादर्शक ठरणार आहे.



