कर्तव्य जपणाऱ्यांचा सन्मान, समाजाला प्रेरणा देणारा सोहळा; मार्कंडेय प्रकाशनच्या वतीने कर्तृत्वाच्या पाठीवर शाबासकीची थाप
कर्तव्य जपणाऱ्यांचा सन्मान, समाजाला प्रेरणा देणारा सोहळा;
मार्कंडेय प्रकाशनच्या वतीने कर्तृत्वाच्या पाठीवर शाबासकीची थाप
नाशिक | प्रतिनिधी
कर्तव्य ही केवळ जबाबदारी नसून ती समाजाशी बांधिलकी असते, हे अधोरेखित करणारा कर्तृत्व सन्मान सोहळा नाशिक येथील प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय येथे रविवारी अत्यंत प्रेरणादायी वातावरणात पार पडला. समाजाच्या विविध क्षेत्रांत पडद्यामागे राहून, कोणतीही अपेक्षा न ठेवता सेवा करणाऱ्या कर्तव्यनिष्ठ व्यक्तींना मार्कंडेय प्रकाशन, साप्ताहिक वृत्तगंध प्रभा आणि आपली दुनियादारीच्या वतीने या सोहळ्यात सन्मानित करण्यात आले.
प्रशासन, पोलीस, आरोग्य, शिक्षण, पत्रकारिता, सामाजिक सेवा आणि आपत्कालीन सेवा क्षेत्रातील मान्यवरांचा या वेळी गौरव करण्यात आला. कर्तव्य बजावताना स्वतःच्या सुखाचा, वेळेचा आणि कधी कधी प्राणांचाही विचार न करणाऱ्या या व्यक्ती खऱ्या अर्थाने समाजाचे आधारस्तंभ आहेत, असे मत प्रमुख पाहुण्यांनी व्यक्त केले.
राहते. अशा व्यक्तींचा सन्मान म्हणजे समाजाने स्वतःकडे पाहण्याचा आरसा असल्याचेही त्यांनी नमूद केले.

या सोहळ्यात लातूर जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि स्व. विलासराव देशमुख आणि दिलीप देशमुख यांचे खंदे समर्थक भगवान पाटील आणि मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेचे सरचिटणीस ऍड नितीन ठाकरे यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सिन्नरचे भूमिपुत्र तसेच घाटकोपर मंडळ भाजप उपाध्यक्ष मुकुंद काकड, ठाणे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता दत्तात्रय गीते यांना कर्मयोगी, सिन्नरचेच निवृत्त मुख्याध्यापक बाळासाहेब हांडे, सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय आव्हाड यांना समाजभूषण तर पत्रकार वैशाली पाटील,आयुब शहा, अफजल पठाण, रामदास भोर, भाऊसाहेब वाकचौरे यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सिंहस्थ कुंभ मेळ्याच्या नियोजनात विशेष योगदानासाठी पोलिस आयुक्तालय अंतर्गत सिंहस्थ कुंभ मेळा कक्षाचे वपोनि माच्छरे, हेड कॉ. अविनाश पवार, धर्मराज पाटील यांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. नोकरी करून दिव्यांग सेवेत समाधान पाहणारे बाळासाहेब सोनवणे आणि तळागाळातील ग्रामिण प्रश्नावर पत्रकारिता करणारे ऍड सागर शिंदे यांचाही सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करतांना संपादक रश्मी मारवाडी यांनी नकारात्मक पत्रकारितेला गुड बाय करून चांगल्याचा शोध घेणे हीच खरी पत्रकारिता असून त्या वाटेवर प्रवास करतांना सापडलेल्या हिऱ्यांना सन्मानित करण्यासाठी या सोहळ्याचे आयोजन आहे.
सन्मान स्वीकारताना अनेक मान्यवर भावूक झाले. आपले काम म्हणजे आपले कर्तव्य आहे, त्याचा सन्मान होईल अशी अपेक्षा नव्हती, अशी भावना अनेक सन्मानितांनी व्यक्त केली. मिळालेला गौरव अधिक प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने काम करण्याची नवी ऊर्जा देणारा असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास विविध क्षेत्रांतील मान्यवर, ज्येष्ठ नागरिक, युवक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिस्तबद्ध आयोजन, अर्थपूर्ण भाषणे आणि समाजभान जपणारा आशय यामुळे हा सोहळा उपस्थितांच्या मनात दीर्घकाळ ठसा उमटवणारा ठरला. प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या मुख्य संचालिका राजयोगिनी ब्रम्हाकुमारी वासंती दीदी यांचेही या सोहळ्याला आशीर्वाद लाभले. स्वामी श्री कंठानंद महाराज, वरिष्ठ पोलिस निरीक्षक माछरे, ऍड साहिल ठाकरे,अभियंता दत्तात्रय गीते, व्हॉईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष दिलीप साळुंके आदी मान्यवर विचार पिठावर उपस्थित होते. हितेश दाभाडे, सचिन शिंदे, अक्षय गायकवाड, नवनाथ आव्हाड, यांचे विशेष सहकार्य लाभले.
आयुब शहा यांनी सूत्रसंचालन व पल्लवी शेटे यांच्या आभारप्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

कर्तव्य जपणाऱ्यांचा सन्मान, समाजाला प्रेरणा देणारा सोहळा;

