सिन्नरसाठी भोजापूरचे आवर्तन सोडा ; खा. राजाभाऊ वाजे यांचे अधीक्षक अभियंत्यांना पत्र
सिन्नरसाठी भोजापूरचे आवर्तन सोडा ;
खा. राजाभाऊ वाजे यांचे अधीक्षक अभियंत्यांना पत्र
सिन्नर प्रतिनिधी
नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी भोजापूर धरणाचे बिगर सिंचनाचे आवर्तन कालव्या द्वारे तात्काळ सोडून अवर्षणग्रस्त सिन्नर तालुक्याला संजीवनी द्यावी अशा आशयाचे पत्र लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंत्यांना दिले आहे.
या पत्रात खा. वाजे यांनी म्हटले आहे की,सिन्नर तालुक्यात आजअखेर पर्यंत समाधान कारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळ सदृश्य परिस्थिती कायम आहे. विशेषतः नांदूर शिंगोटे, दोडी बु., दोडी खु., पांगरी, फुलेनगर (माळवाडी), दुशिंगपूर, कहांडळवाडी, निहाळे, मन्हळ आदींसह लाभक्षेत्रातील गावामध्ये पुरेश्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी न झाल्याने माणसांसह पशुधनाच्या पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले असून आजही ही गावे पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून आहेत.
भोजापूर धरणातून पाण्याचे आवर्तन सोडणेबाबत परिसरातील ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात मागणी असून भोजापूर धरणातून बिगर सिंचनाचे पाणी कालव्यांद्वारे लाभक्षेत्रातील तलाव, बंधाऱ्यामध्ये तसेच फुलेनगर (माळवाडी) येथील ल. पा. तलावात सोडल्यास विहिरींना पाझर येवून लाभक्षेत्रातील गावांमधील पिण्याच्या पाण्याचा तसेच पशुधनाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्यास मोठ्या प्रमाणावर मदत होणार आहे. तसेच या गावांतील टॅंकर देखील बंद होणार आहेत. Wes-8-2029 तरी भोजापूर धरणातून बिगर सिंचनाचे आवर्तन सोडणे बाबत आपले स्तराहून लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही व्हावी.