नाशिक पोलिस आयुक्तांनी फिरवली भाकरी ;११ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या प्रयोग यशस्वी होणार की…..?
नाशिक पोलिस आयुक्तांनी फिरवली भाकरी ;११ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या
प्रयोग यशस्वी होणार की…..?
Advertisement
नाशिक प्रतिनिधी
नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शहराची ढासळू पाहणारी कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी भाकरी फिरवण्याचं प्रयोग केला असून तेरा पैकी 11 पोलिस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर घाऊक बदल्या करण्याचे पोलिस आयुक्तांनी प्रथमच केले आहे.
यामध्ये पंचवटी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मधुकर शिवाजी कड अंबड पोलिस ठाणे प्रभारी, भद्रकाली पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र रघुनाथ पाटील पंचवटी पोलीस ठाणे प्रभारी, अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश आनंदराव चौधरी भद्रकाली पोलिस ठाणे प्रभारी, उपनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जितेंद्र भीमराव सपकाळे नाशिकरोड पोलीस ठाणे प्रभारी, देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयंत भारत शिरसाट उपनगर पोलिस ठाणे प्रभारी, चिंचोले पोलिस चौकीचे पोलिस निरीक्षक मनोहर रामा कारंडे अंबड पोलिस ठाणे दुय्यम, सातपूर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वास रोहिदास पाटील चिंचोळे पोलिस चौकी प्रभारी, नियंत्रण कक्षातील पोलिस निरीक्षक संजय मारुती पिसे आडगाव पोलीस ठाणे प्रभारी, आडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन मुरलीधर खैरनार अंबड पोलीस ठाणे दुय्यम, भद्रकाली पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्रीनिवास भगवान देशमुख देवळाली कॅम्प पोलिस ठाणे प्रभारी, नाशिकरोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक उत्तमराव गिरी सरकारवाडा पोलिस ठाणे दुय्यम पोलीस निरीक्षक पदी बदली करण्यात आली. अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राकेश हांडे यांना अजून नियुक्तीच्या प्रतीक्षेत नियंत्रण कक्षात ठेवण्यात आले आहे.पोलिस आयुक्तांचा हा प्रयोग ढासळू पाहणारी कायदा सुव्यवस्था पूर्व पदावर आणण्यात किती यशस्वी होतो, हे आगामी काळात लक्षात येईल.
या बदली प्रक्रियेमुळे बरेच महिने पंचवटी पोलिस ठाण्याचा कारभार पाहण्यासाठी इच्छुक असलेले गजेंद्र पाटील यांची मनीषा पूर्ण झाली असली तरी पंचवटी पोलिस ठाण्यासाठी बढती नाकारणारे मधुकर कड यांना काहीशा अनिच्छेने का होईना बदली स्वीकारावी लागल्याची आयुक्तालयात चर्चा आहे. अर्थात पंचवटी इतकेच संवेदनशील मानले जाणारे अंबड पोलिस ठाणे पदरात पाडून घेण्यास कड यांना मिळालेले यश त्यातल्या त्यात समाधान देणारे ठरले. किंबहुना एक डोळा मागणाऱ्या अंधाला दोन डोळे मिळावेत, असेच दान आयुक्तांनी कड यांच्या पदरात टाकले असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरू नये. एकूणच समर्थक गोतावळा लक्षात घेता पंचवटीच्या तुलनेत अंबड मध्ये कड यांची कारकीर्द अधिक बहरेल, या चर्चेला बराच अर्थ आहे.
बाकी अन्य पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांचा विचार करता उपनगर पोलिस ठाण्यात एका वेगळ्या अर्थाने वादग्रस्त चर्चेत राहिलेले पोलिस निरीक्षक जितेंद्र सपकाळ यांना नाशिकरोडची जहागिरी देतांना पोलिस आयुक्तांनी कुठला सकारात्मक विचार केला, हा संभ्रम आयुक्तालयात चर्चेचा विषय ठरतो आहे. उर्वरित पोलिस निरीक्षकांच्या बदलीने फार काही फरक पडणार नसला तरी हांडे यांच्यासारखे तडफ असलेले अधिकारी लटकवून ठेवणे कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने शहाणपण ठरणार नाही.अशीही दबक्या आवाजातील चर्चा पोलिस आयुक्तांच्या कानावर पडेल. ही अपेक्षा.



