अश्विन महिन्यात येणारी पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमा म्हणजेच अश्विन पौर्णिमा / शरद पौर्णिमा
अश्विन महिन्यात येणारी पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमा म्हणजेच अश्विन पौर्णिमा / शरद पौर्णिमा
हिंदू संस्कृतीमध्ये जे काही सण सांगितलेले आहेत त्यांचे शास्त्रीयदृष्ट्या देखील खूप महत्व आहे. ते योग्य प्रकारे समजवून घेऊन साजरे केले तर आरोग्य उत्तम राखण्यासाठी मदत करतात.
कोजागिरी पौर्णिमा ही शरद ऋतुत येणारी पौर्णिमा आहे.
शरद ऋतु आधी असणारा वर्षा ऋतु म्हणजेच पावसाळा. पावसाळा म्हटल की आठवते थंड हवा, गरम गरम भजे, चमचमीत पदार्थ आणि वाफाळलेला चहा ! या अशा प्रकारच्या आहारामुळे शरीरात पित्त दोष वाढून साठू लागतो आणि त्यानंतर येणार्या शरद ऋतुमधे (म्हणजेच आजच्या भाषेत सांगायच तर ऑक्टोबर हीट) सूर्याच्या पडणार्या कडक उन्हाने हे साठलेले पित्त वाढून अनेक पित्ताचे त्रास सुरू होतात, त्यामुळे या ऋतुत शरीराला थंड, सौम्य, पित्त कमी करणारे अशा आहाराची गरज असते. दूध हे उत्कृष्ट पित्तशामक सांगितलेले आहे त्याचबरोबर चंद्राचा प्रकाश हा शीतल, आल्हाददायक त्याचबरोबर मनाला स्थिरता देणारा असा आहे. म्हणुनच या चंद्राची छाया पडून त्याचे गुणधर्म दुधात उतरतील आणि पित्तशमन होईल म्हणुन रात्री चंद्रप्रकाशात आपल्या जवळच्या व्यक्तींसोबत बसुन मैफिलीत गप्पागोष्टी करत दूध पिण्याचा हा सण! पण अलीकडे या बरोबरच इतर पदार्थ जसे दाबेली, पाणीपुरी, पावभाजी इ. चा बेत असतो जे आरोग्यदृष्ट्या अत्यंत चुकीचे आहे.
काय नियम पाळावेत:
– संध्याकाळी हलका आहार घ्यावा जेणेकरून दूध पिण्यासाठी भूक राहील.
– दूध फ्रिज मध्ये ठेऊन थंड करू नये.
– कफाचा त्रास असल्यास शक्यतो दूध पिणे टाळावे.
– दुधाबरोबर इतर पदार्थ घेऊ नये.
– अतिप्रमाणात सुकामेवा वापर करू नये. (दुध पचण्यास अजुन जड होते)
– हलका कोठा असल्यास दूध पिऊ नये / अगदी कमी प्रमाणात घ्यावे.
अशाप्रकारे योग्य ते नियम पाळून कोजागिरी साजरी केली गेली तर आरोग्यदायी कोजागिरी साजरी होईल.
सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!!
डॉ. प्राजक्ता थोरात
अमृता आयुर्वेद व पंचकर्म चिकित्सालय
एम. डी. (आयुर्वेद)
९५५२५७३९९१