बहीण लाडकी, भाचे मात्र शालेय गणवेशाच्या प्रतीक्षेत! उंचखडक शालेय समितीचे मामाच्या भूमिकेतील शासनाला खरमरीत पत्र
बहीण लाडकी, भाचे मात्र शालेय गणवेशाच्या प्रतीक्षेत!
उंचखडक शालेय समितीचे मामाच्या भूमिकेतील शासनाला खरमरीत पत्र
अकोले प्रतिनिधी
लाडक्या बहिणींना महिन्याला पंधराशे रुपये देऊ करणाऱ्या शासन मामाची भाच्यांना शालेय गणवेश देण्याची ऐपत नसेल तर आम्हाला सांगावे, आम्ही व्यवस्था करू, असे खरमरीत पत्र उंचखडक येथील जिल्हा परिषद सेमी इंग्लिश शालेय समितीने गट विकास अधिकाऱ्यांसह राज्यपालांना लिहिले आहे.
शालेय समितीचे अध्यक्ष सागर शिंदे यांची स्वाक्षरी असलेल्या या पत्रात खेद व्यक्त करून म्हटले आहे की, मुख्यमंत्री महोदय यांनी भर विधानसभेत जिल्हा परिषद शाळेच्या मुलांचा शालेय गणवेश दाखविला आणि त्याची क्वालिटी देखील दाखविली होती. मात्र, तो गणवेश मुलांना मिळणार आहे किंवा नाही? कि तो फक्त भुषण म्हणून दाखविण्यापुरता होता.याचे स्पष्टीकरण आपण द्यावे. कारण, शाळा सुरू होऊन तीन महिने होत आले. दुसरीकडे १५ ऑगस्टचा राष्ट्रीय उत्सव आठ दिवसावर आला आहे. तरी अद्याप गणवेश नाही. काही ठिकाणी गोरगरिबांची मुले रोज फाटके कपडे घालुन शाळेत येतात. ही परिस्थिती किती दिवस चालणार आहे? शासन-प्रशासन एकीकडे लाडकी बहिन योजना राबवत आहे. तर त्याच बहिनीची लेकरं फाटकी वस्त्र परिधान करुन शाळेत येत आहेत . बहिनीला १५०० रुपये देण्यापेक्षा तिच्या लेकरांना तीनशे रुपयांचा गणवेश आपण देणार आहात की नाही? याबाबत आपण स्पष्टीकरण द्यावे.
त्याच पत्रात पुढे असेही म्हटले आहे की,
खरंतर हे फार मोठे दुर्दैव आहे. की, एकीकडे इंग्रजी माध्यमांचे फॅड वाढत चालले असून मराठी शाळेचा दर्जा, त्यातील संस्कार आणि शासन-प्रशासनाचा मनमानी कारभार यात अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. गेल्या तीन महिन्यांपासून मुले शाळेचा गणवेश आणि बुटाच्या प्रतिक्षेत आहेत. मात्र, मुलांना शाळेचा गणवेश मिळत नाही. त्यामुळे शिक्षण विभागाला हे साहित्य द्यायचा नाही की शासनाकडे पैसे नाहीत ? याची माहिती आपण लेखी द्यावी. हे असेच चालु राहीले तर मराठी शाळेकडे पाहण्याचा दृष्टीकोण कसा बदलेल ? गेल्या तीन महिन्यात आमच्या उंचखडक बु शाळेने विद्यार्थ्यांना लोकवर्गणीतून एक स्पोर्ट ड्रेस व प्रत्येक विद्यार्थ्याला दिल्लीहून आलेले टि-शर्ट शुज वाटले आहे. जर शासन आणि प्रशासन यांची मानसिकता नसेल किंवा शासनाची ऐपत नसले तर तसे आम्हाला कळवावे. येणाऱ्या १५ ऑगस्ट २०२४ रोजी शाळा व्यवस्थापन समिती स्व-खर्चाने सर्व विद्यार्थ्यांना गणवेश देईल.

बहीण लाडकी, भाचे मात्र शालेय गणवेशाच्या प्रतीक्षेत!

