गोठ्यात कत्तलीचा ‘डेथ कॅम्प’ विना चारा-पाण्याच्या अमानुष कैदेत १० गायी; विधीसंघर्षित बालकासह एक जेरबंद _संगमनेरला कत्तलीसाठी रवाना करण्याचा डाव पोलिसांनी पहाटेच हाणून पाडला_
गोठ्यात कत्तलीचा ‘डेथ कॅम्प’
विना चारा-पाण्याच्या अमानुष कैदेत १० गायी; विधीसंघर्षित बालकासह एक जेरबंद
_संगमनेरला कत्तलीसाठी रवाना करण्याचा डाव पोलिसांनी पहाटेच हाणून पाडला_
नाशिक | प्रतिनिधी
नाशिक शहरात गोवंश कत्तलीचा काळाबाजार किती निर्ढावला आहे, याचा संतापजनक नमुना कमलवाडी-निमसेमळा परिसरात पोलिसांनी केलेल्या कारवाईतून चव्हाट्यावर आला आहे. कत्तलीसाठी १० जिवंत गायी अक्षरशः गोठ्यात डांबून ठेवण्यात आल्या होत्या. ना चारा, ना पाणी, ना हालचालीची मोकळीक. फक्त मृत्यूची वाट पाहणारी जनावरे! या अमानुष प्रकारावर गुन्हे शाखा युनिट-१ ने पहाटे धाड टाकत १० गोवंशांची सुटका केली. या प्रकरणात काल्या उर्फ इर्शाद कुरेशी याला ताब्यात घेण्यात आले असून, एका विधीसंघर्षित बालकाचाही या साखळीत वापर झाल्याचे समोर आले आहे.
ही कारवाई केवळ १० गायींची सुटका नाही, तर नाशिकच्या उपनगरांत गोवंश कत्तलीचा अड्डा उभा राहत असल्याचा धक्कादायक इशारा आहे.
गोठा की कत्तलीचे प्रतीक्षागृह?
गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली की, कमलवाडी, निमसेमळा येथील एका गोठ्यात गोवंश जातीची जनावरे कत्तलीसाठी चारा-पाण्याविना डांबून ठेवण्यात आली आहेत. माहितीची खातरजमा होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने पहाटे छापा टाकला.
गोठ्याचे दार उघडताच पोलिसांसमोर जे दृश्य आले, ते अस्वस्थ करणारे होते. १० गोवंश जनावरे बांधून ठेवलेली… अंगावर उपासमारीची छाया… डोळ्यांत भीती… आणि पुढचा टप्पा थेट कत्तल! हा गोठा जनावरांच्या संगोपनासाठी नव्हता, तर कत्तलीपूर्वीची तात्पुरती कैद बनला होता, असे चित्र या कारवाईतून स्पष्ट झाले.
‘काल्या’चा पर्दाफाश; बालकाचाही वापर!
या कारवाईदरम्यान पोलिसांनी काल्या उर्फ इर्शाद अब्दुल रेहमान कुरेशी (वय ३८) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने ही जनावरे नाझीम शेख आणि एका अल्पवयीन मुलाकडून आणल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी नांदूरनाका परिसरातून विधीसंघर्षित बालकाची चौकशी केली असता, ही जनावरे संगमनेरला कत्तलीसाठी नेण्यात येणार होती, अशी धक्कादायक कबुली समोर आली.
गोवंश तस्करीच्या या घाणेरड्या साखळीत अल्पवयीन मुलांचाही वापर केला जातोय का? जर होय, तर हे प्रकरण फक्त प्राणी संरक्षण कायद्यापुरते मर्यादित राहत नाही; ते गुन्हेगारीचे समाजघातक जाळे असल्याचे संकेत देते.
१.९० लाखांचा गोवंश वाचला; पण….
पोलिसांनी या कारवाईत १ लाख ९० हजार रुपये किंमतीच्या १० गायींची सुटका केली. सुटका केलेला गोवंश कृषी गोसेवा ट्रस्ट, तपोवन यांच्या ताब्यात देण्यात आला. परंतु, या घटनेने काही अस्वस्थ करणारे प्रश्न पुन्हा समोर आणले आहेत.
गोवंश नेमका कुठून आणला गेला?
नाशिकमध्ये असे आणखी किती ‘सेफ हाऊस’ किंवा गोठे आहेत?
संगमनेरपर्यंत जनावरे पोहोचवणारी वाहतूक साखळी कोण चालवते?
स्थानिक पातळीवर याला संरक्षण देणारे हात कुणाचे?
१० गायी सापडल्या, आरोपी सापडला; पण या साखळीचा सूत्रधार अजूनही बाहेर मोकाट आहे का? हा प्रश्न अधिक महत्त्वाचा ठरतो.
आडगाव पोलिसांत गुन्हा;
या प्रकरणी आरोपीविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ अंतर्गत कलम ५ व ९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कारवाईसाठी आरोपीला आडगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलिसांनी प्राथमिक कारवाईत मोठे यश मिळवले असले, तरी फक्त एकाला पकडून हे प्रकरण संपणार नाही. जनावरे पुरवणारे, ठेवणारे, वाहतूक करणारे आणि कत्तलीच्या ठिकाणी पोहोचवणारे या संपूर्ण साखळीचा छडा लागला तरच ही कारवाई खऱ्या अर्थाने परिणामकारक ठरेल.
ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णीक, पोलीस उपआयुक्त किरणकुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. गुन्हे शाखा युनिट-१चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल, पोउनि चेतन श्रीवंत, विशाल काठे, प्रदीप म्हसदे, विशाल देवरे, मिलींदसिंग परदेशी, संदीप भांड, प्रशांत मरकड, अमोल कोष्टी, मुक्तार शेख आणि समाधान पवार यांनी ही कारवाई केली.
पोलिसांनी वेळीच धाड टाकून १० मुक्या जीवांना वाचवले, ही कौतुकास्पद बाब आहे. पण प्रश्न फक्त एवढाच नाही. शहराच्या उंबरठ्यावर गोवंश कत्तलीची अशी केंद्रे तयार होत असतील, तर स्थानिक प्रशासन, पशुसंवर्धन यंत्रणा आणि गुप्त माहिती व्यवस्था नेमकी काय करत होती?
गोठ्यातून सुटका झालेल्या त्या गायी बोलू शकत नाहीत.
पण त्यांची ही हतबल अवस्था एक प्रश्न विचारते
“आम्हाला वाचवायला पोलीस आले, पण आम्हाला या नरकात आणलं कोणी?”त्याचे अंतिम उत्तर मिळणे अपेक्षित आहे.



